मुंबई : भाजपाला विनंती करेन की, बिहार, महाराष्ट्रात लढणे सोडून द्या. अमेरिकेत आता उमेदवार उभे करा. तेथील राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवा आणि तेथे जिंकल्यावर टॅरिफचा घोळ झाला आहे, तो काढून टाका. तसेच यूएन जनरल असेंब्लीमध्ये उमेदवार उभे करा. सिक्यूरिटी काउंसिलमध्ये उभे करा. तिथेही तुमचा काय दबदबा आहे, तो निवडणूक आयोगाने दाखवू द्या, असा खोचक टोला ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी लगावला.
राहुल गांधी यांनी देशातील काही राज्यांमध्ये व्होटचोरी कशी झाली हे दाखवले. त्यानंतर आम्ही वरळीत काय झाले, हे दाखवले. लवकरच मुंबई आणि महाराष्ट्रात काय झाले, हे दाखवणार आहोत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यात आपण पाहिले असेल की, अशी काही उदाहरणे समोर आली आहेत की, कोणी पुण्यात मतदान केले आहे, त्याच व्यक्तीने जाऊन बिहारमध्ये मतदान केले आहे. कुणी दिल्लीत मतदान केले, त्याच व्यक्तीने जाऊन बिहारमध्ये मतदान केले. वाराणसीतील भाजपा पदाधिकारी बिहारमध्ये जाऊन मतदान करत होते, असा मोठा दावा आदित्य ठाकरेंनी केला.
बिहार निवडणूक निकालाने कुणालाही धक्का बसलेला नाही
हे सगळे पाहून देश म्हणून आपण शांत बसणार असू, तर हुकुमशाहीला आमंत्रण देत आहोत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. बिहार निवडणुकीचे जे काही निकाल आले, त्याने कुणालाही धक्का बसलेला नाही. हा निकाल अपेक्षित होता. कारण निवडणूक आयोग कुणाचा आहे, हे सर्वांना माहिती आहे. मी मनापासून निवडणूक आयोगाचे अभिनंदन करतो की, त्यांचा मोठा विजय झालेला आहे. साधारण 65 लाख मतदार कमी केल्यानंतर काय होऊ शकते, हे पाहायला मिळाले, या शब्दांत आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला.