नवी दिल्ली : भाजप हा मोदीकेंद्रित पक्ष असल्याचा आरोप फेटाळून लावत भाजप कधीच व्यक्तिकेंद्रित होणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गडकरी म्हणाले, भाजप वाजपेयी किंवा अडवाणींचा पक्ष झाला नाही. तसेच तो केवळ अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांचा पक्ष होणार नाही. भाजप कधीच व्यक्तिकेंद्रित नव्हता आणि होणारही नाही. कारण, तो विचारधारेवर आधारलेला आहे. तो तसा होईल, ही चुकीची कल्पना आहे. भाजप आणि मोदी किंवा भाजप आणि पक्षाचे नेते हे परस्परांना पूरक आहेत, असेही मत त्यांनी व्यक्तकेले.लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नाही, असे अनेकांनी केलेले भाकीत गडकरी यांनी फेटाळले. गेल्या वेळेपेक्षा भाजपला जास्त जागा मिळतील. पक्ष मजबूत असेल;परंतु त्याचे नेते कमकुवत असतील आणि नेते मजबूत असतील परंतु पक्ष कमकुवत असेल तर निवडणुका जिंकता येत नाहीत. मात्र, लोकप्रिय नेते स्वाभाविकपणे पुढे येतात, असे गडकरी म्हणाले.