छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः महापालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळविलेल्या भाजप नेत्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. महापालिकेवर एकहाती सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे चार दशकांचे स्वप्न आता साकार होत आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटासोबत भाजप हातमिळवणी करणार का, हा खरा प्रश्न आहे. दुसरीकडे आम्ही महापौर महायुतीचाच होईल आम्ही पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे प्रस्ताव देणार आहोत, अशी माहिती आ. संजय केणेकर यांनी सांजवार्ताशी बोलताना दिली.
महापालिका निवडणुकीचे निकाल लागताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचा मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाला अवघ्या १३ जागा मिळाल्याने शिंदे गट बॅकफुटवर आला आहे. निकाल लागताच भाजप नेत्यांनी महापौर पदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर शिंदे गट अजूनही निकालाच्या धक्क्यातून सावरला नसल्याचे दिसून येते. अंतर्गत कलहाने शिंदे गट अडचणीत आल्याचे सध्या तरी चित्र आहे. भाजप नेते आ. केणेकर यांनी मात्र आम्ही निवडणुका जरी स्वतंत्र लढलो तरी आमची शिवसेनेशी युती आहेच. आम्ही वरिष्ठांशी विचारविनिमय करणार आहोत. लवकरच शिंदे गटाला प्रस्ताव देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपची चाल आक्रमक...
दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार, भाजप शिंदे गटाला गोंजारण्याच्या मुडमध्ये नाही. महापालिकेच्या ११५ जागांपैकी ५७ जागा म्हणजे बहूमतासाठी अवघी एक जागा कमी असल्याने भाजप शिंदे गटाचे लाड पुरवायला तयार नाही. आपल्या नगरसेवकांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्यासाठी शिंदे गटाने बाहेरून पाठींबा द्यावा असा प्रस्ताव भाजप ठेऊ शकतो.
अल्लडपणाचा भोपळा फुटला ः आ. केणेकर
शिंदे गटाच्या नेत्यांनी आपल्या हेकेखोरपणामुळे अनेक जागा गमावल्या. त्यांच्या मुलांसाठी त्यांनी प्रचंड ताकद खर्च केली. परिणामी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांनाही त्यांना वेळ देता आला नाही. शिवसेनेची अवस्था इतकी वाईट होईल याची आम्हीही कल्पना केली नव्हती. त्यांच्या अल्लडपणाचा भोपळा अखेर फुटलाच. तरीही आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव देऊ अन वरिष्ठ पातळीवर पुढील निर्णय होईल.