पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक

Foto
 पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानंतर संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी पुण्यातील काँग्रेस भवनासमोर जोरदार आंदोलन केले.
भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काँग्रेसच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारले. यावेळी भाजप कार्यकर्ते काँग्रेस भवनामध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याने दोन्ही बाजूकडील पदाधिकारी एकमेकांसमोर आले. यावेळी झालेल्या झटापटीत कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. जवळपास तासभर हा राडा सुरू होता. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दिशेने दगड भिरकावल्याचा आरोप करण्यात येतो आहे. झालेल्या दगडफेकीत एक-दोन काँग्रेस कार्यकर्ते रक्तबंबाळ झाले. काँग्रेस नेते मोहन जोशी आणि प्रशांत जगताप यांनी भाजपच्या आंदोलनाचा निषेध केला. पुणे भाजपने दुपारी १२ वाजता काँग्रेस भवनासमोर आंदोलनाला सुरुवात केली. काही मिनिटांत भाजपचे शेकडो कार्यकर्ते काँग्रेस भवनासमोर जमा झाले.

सुरुवातीला सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करून काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांचा प्रचंड फौजफाटा असल्याने भाजप कार्यकर्ते आतमध्ये शिरू शकले नाहीत. मात्र यावेळी झालेल्या झटापटीत कार्यकर्त्यांना दुखापत झाली. फरासखाना पोलिस स्टेशला मांडी घालून बसणार, धीरज घाटे आणि महापौर यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोवर आम्ही उठणार नाही, आमच्या माणसांची डोकी फोडली आहेत, जोपर्यंत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही, तोवर आम्ही शांत बसणार नाही, त्यांनी टेम्पो भरून दगडं आणली असल्याचा दावा देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.