औरंगाबाद: भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘मोदी लाटे’ वर आरूढ होत ’अब की बार मोदी सरकार’ असा नारा देत केंद्रात सत्ता मिळवली. आता यावेळेच्या लोकसभा निवडणुकीतही पुन्हा एकदा ‘फिर एक बार मोदी सरकार’ अशी घोषणा देत भाजपने प्रचार सुरू केला आहे. भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेही पोस्टरबाजी सुरू केली असून, ‘सुशिक्षित तरुणांना पकोडे तळायला लावणार्या सरकारला लाज कशी वाटत नाही?’ असा सवाल या पोस्टरमधून भाजपला विचारला आहे. शहरात ठिकठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर लावलेलेली अशी पोस्टर्स नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पाच वर्षांपूर्वी भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराची राळ उडवून दिली होती. देशभर टीव्ही व अन्य प्रसारमाध्यमांसह काँग्रेसच्या विरोधात बॅनर व पोस्टरबाजी करत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा भाजपला चांगला फायदा झाला होता. आता पुन्हा एकदा भाजपने निवडणूक प्रचाराचे नवनवीन फंडे वापरण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस महाआघाडीने विविध ठिकाणी ’लाज कशी वाटत नाही?’ असे पोस्टर्स लावून भाजपविरोधी प्रचार सुरू केला असताना भाजपनेही ’फिर एक बार मोदी सरकार’ असा नारा देत जाहिरातीबाजी सुरू केली आहे. सध्या निवडणुकीच्या काळात शहरात अशा पोस्टरबाजीची धूम सुरू आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळातही भाजपच्या वतीने शहर व जिल्ह्यात विरोधकांवर टीका जशास तसा प्रचार करणारे बॅनर, पोस्टर व होर्डिंग्ज लावण्यात आले होते. अशा प्रकारच्या जाहिरातबाजीने त्यावेळी लोकांना भुरळ घातली होती. त्यावेळी प्रसारित होणार्या जाहिरातीमधील पोस्टर बाईज्चे ब्रीदवाक्य ’जनता कभी माफ नही करेगी’ असे होते. आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी पोस्टरबाजी सुरू असताना ’खोटारड्यांना खाली खेचू’ असे म्हणत भाजप विरोधकांकडून जाहिरातबाजी केली जात आहे. निवडणुकीच्या प्रचारात जाहिरातबाजीला मोठे महत्त्व असते. हे लक्षात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच इतर राजकीय पक्षांकडून अशा प्रकारे प्रचार करण्यास भर दिला जात आहे. जाहिरातीत वापरण्यात येणार्या व्यक्ती, त्यांच्या तोंडी घातलेले वाक्य हा नेहमीच लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरत असतो. भाजप व मोदी सरकारने २०१४ च्या निवडणुकीत प्रचाराकरिता या तंत्राचा व्यवस्थित वापर करत सत्ता मिळवली. आता राहिला प्रश्न तो या पोस्टर बॉईजचा. यात दिसणार्या व्यक्ती आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण गेल्या पाच वर्षांत खरेच झाले का, हा कळीचा मुद्दा आहे.
लोकांना आपल्या पक्षाविषयी माहिती व्हावी तसेच विरोधी पक्षाविषयी प्रश्न विचारणे याकरिता पोस्टरबाजीचा वापर केला जातो. मोदी सरकारने याच तंत्राचा जास्त वापर करत लोकांची कशी धूळफेक केली तेच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्ता मिळेपर्यंत चालणार्या या प्रचाराच्या रणधुमाळीत भाजप असो अथवा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असो, हे पक्ष पोस्टर वा बॅनरमध्ये उल्लेख केलेले प्रश्न सोडवतील का, असा सवाल उपस्थित होतो. खरेच भाजप सरकाने ‘अच्छे दिन’ आणलेत का? असा प्रश्नही पडतो. विरोधी पक्ष भाजपच्या विरोधात त्यांच्याच शैलीत प्रचार करत आहेत. ज्यातून भाजपवर उपहासात्मक टीका केली जात आहे. सत्ता कोणाचीही असो अथवा भविष्यात येवो;परंतु सर्वसामान्य नागरिकांचे जे प्रश्न पोस्टरच्या माध्यमातून दाखवित मत मागितले जाते त्याचप्रमाणे ते प्रश्न राजकीय नेत्यांनी सोडवावेत, अशीच भोळीभाबडी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक नेहमीच निवडणुकीच्या काळात व्यक्त करत असतात.
जसे भाजप सरकारने महागाई, विविध योजनांमधील घोटाळे, नोकरी, पाणी, वीज, पेट्रोल, शिक्षण, आरक्षण, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिला सुरक्षितता आदी सर्वसामान्यांच्या विषयात हात घालून पूर्वीच्या सरकारने केलेला अन्याय किंवा नागरिकांची झालेली अवहेलना दाखविली त्याचप्रमाणे आता २०१९ च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी त्याच सर्व समस्यांचा पाढा वाचत भाजप व मोदी सरकारवर टीका करत प्रचार सुरू केला आहे. नकारात्मक स्वरुपात प्रचार करत राज्यात पोस्टरबाजी सुरू केली आहे. ’आता लाज कशी वाटत नाही’ या वाक्याचा प्रचार जोरात सुरू आहे.