मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून पहिली ६६ नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत तेजस्वी घोसाळकर, गणेश खणकर, मनिषा यादव, मिलिंद शिंदे, नवनाथ बन, आकाश पुरोहित यांच्यासह अनेक नावांचा समावेश आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या रवी राजा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. धारावीतील वॉर्ड क्रमांक १८५ मधून राजा निवडणूक लढवणार आहेत. रवी राजा हे मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते होते. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. दरम्यान, मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये १५ जानेवारी २०२६ ला मतदान होणार आहे. तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल.
शिंदे सेनेचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून अद्यापही एकाही उमेदवाराचं अधिकृत असं नाव पुढे आलेलं नाही. जागावाटपाचा आकडा देखील निश्चित झालेला नाही. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला अंधारात ठेवण्यात आलंय का असा सवाल उपस्थित होत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील २८ उमेदवारांना एबी फॉर्म दिलेत. आज उद्या भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उमेदवारी अर्जदेखील दाखल करणार आहेत, मात्र शिंदेंसेनेनं त्यांच्या एकाही उमेदवार जाहीर केलेला नाही. दरम्यान, मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये १५ जानेवारी २०२६ ला मतदान होणार आहे. तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल.