जगद्वरा संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त समर्पित कलश यात्रा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) :
संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे देशभरात समरसता संकल्प अभियान राबविण्यात येत असून, या अभियानाचा भाग म्हणून वाराणसीहून निघालेली संत रविदास महाराज कलश यात्रा छत्रपती संभाजीनगरात दाखल झाली आहे. उद्या ७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मुकुंदवाडी येथील रविदास महाराज मंदिरातून या कलश यात्रेला प्रारंभ होणार असून, कासलीवाल मैदान येथे तिचा समारोप होईल, अशी माहिती यात्रेचे राज्य सहसंयोजक आ. नारायण कुचे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बहूजन कल्याण मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, आ. अनुराधा चव्हाण, माजी आ. संजय केणेकर, भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे, महापौर समीर राजूरकर, नगरसेविका छाया
खाजेकर आदींची उपस्थिती होती.
आ. कुचे यांनी सांगितले की, कासलीवाल मैदानावर संतांच्या हस्ते कलशाचे पूजन करण्यात येणार असून, त्यानंतर भाजपा संघटनात्मक रचनेतील ७२ जिल्ह्यांकडे हे कलश रवाना केले जाणार आहेत. या कार्यक्रमाला भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस खासदार दुष्यन्त गौतम, अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालसिंग आर्य, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यात्रेचे शहरातील विविध ठिकाणी भाजपा कार्यकर्ते व सामाजिक संघटनांकडून स्वागत करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे संयोजन आमदार माधवी नाईक करत असून, सहसंयोजक म्हणून आमदार नारायण कुचे, विश्वजीत गायकवाड, राहुल तुपसांडे, राम सातपुते आदी जबाबदारी सांभाळत आहेत.
https://epaper.sanjwarta. Powered By: Vrudhee Solutions












