आता लक्ष दिलेल्या आश्वासनाच्या अंमलबजावणीकडे
वाळूज महानगर, (प्रतिनिधी) : रांजणगाव शेणपुंजी परिसरात अवैध दारू विक्री, मटका, जुगार असे घंदे जोरात सुरू आहेत. पण, याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप ग्रामपंचायतीने केला. यामुळे परिसरातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली. सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे सर्व अवैध धंदे बंद करावे, या मागणीकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायतीने सोमवारी (दि.२२) गावबंदची हाक दिली होती. याला व्यापारी, महिला, ग्रामस्थ आणि सर्व पक्षांचा पाठिंबा मिळाला. दिवसभर बाजारपेठ कडकडीत बंद होती.
गावातून फेरी काढून ग्रामपंचायत कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावर अवैध धंद्यांविरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तू हिवाळे, माजी पंचायत समिती सदस्य दीपक बडे, प्रभाकर महालकर, बाबूराव हिवाळे, माधवराव कावरखे, सरपंच कविता हिवाळे, उपसरपंच भीमराव कीर्तीकर आणि इतर प्रतिनिधींनी उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अजय बगाटे, सुभाष सोनवणे, भारत गरड, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ जाधव, मोहिनीराज
धनवटे, दीपक सदावर्ते, मोहिनी बडे, कृष्णा लोहकरे, ईश्वर जाधव, काकासाहेब कोळसे, शरद कीर्तिकर, गंगाराम हिवाळे, जे. के. अमराव, नंदा राजपूत, अशोक गोरे, आलीम सय्यद, जावेद सय्यद, रमा उबाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर गवई, सुभाष गोरे, शेख नवाब, मीना पन्हाळ, नितीन शेजवळ, गोटीराम महाराज राऊत, माधव महाराज सेनगावकर यांच्यासह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे आणि तालुका आरोग्य अधिकारी तुपे यांना निवेदन देण्यात आला.
तर मालमत्तांच्या नोंदी रद्द होणार :
ठोस मोहीम राबवून परिसरातील सर्व अवैध दारू विक्री आणि इतर बेकायदेशीर धंदे बंद करण्यात येतील, असे आश्वासन वरिष्ठ पोलिस निरीक्षक गाडे आणि राज्य उत्पादन शुल्कचे बगाटे यांनी दिले. गावातील घरमालकांनी अवैध धंदे करणाऱ्यांना दुकाने, घरे, जागा भाड्याने दिल्यास त्या घरमालकांच्या मालमत्तेच्या नोंदी ग्रामपंचायतीकडून रद करण्यात वेतील, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
जनहित याचिकेची तयारी :
आठ दिवसांत रांजणगावातील अवैध धंदे बंद केले नाही तर ग्रामपंचायतीच्या वतीने संबंधित विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य हिवाळे यांनी दिली.















