बँकॉक हादरले! पबमध्ये भीषण आगीत २७ जणांचा मृत्यू, जीव वाचवायला टॉयलेटमध्ये लपले पण जीव गेलाच !!

Foto
बँकॉक : थायलंडची राजधानी बँकॉक इथल्या एका प्रसिद्ध पबमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर अग्नितांडव पाहायला मिळाला. या भीषण आगीत २७ जणांचा होरपळून आणि गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत ६० हून अधिक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

उत्तर बँकॉकच्या चातुचक भागातील अत्यंत लोकप्रिय असलेले राँग बीअर ना लात फ्राव हे रेस्टॉरंट आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अग्निशामक दलाला सोमवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास या पबमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पबमध्ये अचानक स्टेजजवळ असलेल्या मुख्य सर्किट ब्रेकरमधून धूर निघताना दिसला. त्यानंतर काही सेकंदांतच तिथे मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर पबमध्ये सर्वत्र आग भडकली आणि संपूर्ण इमारतीत विषारी धूर पसरला.

अग्निशामक दलाच्या जवानांनी जवळपास अर्ध्या तासातच  आगीवर नियंत्रण मिळवले, पण तोपर्यंत संपूर्ण इमारत जळून खाक झाली होती. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये १८ महिला आणि ९ पुरुषांचा समावेश आहे.
वाचण्यासाठी टॉयलेटचा घेतला आसरा, तिथेच मृत्यूने गाठलं

थायलंडचे पंतप्रधान अनुतीन चर्नविराकुल यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली, तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर पबच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. प्रचंड धूर आणि गोंधळामुळे अनेक नागरिकांना बाहेर पडण्याचा रस्ता सापडला नाही. जीव वाचवण्यासाठी अनेकजण इमारतीचा पाठीमागे गेले आणि तिथल्या टॉयलेटमध्ये जाऊन बसले. मात्र, तिथेच गुदमरून बहुतांश लोकांचा मृत्यू झाला. अधिकार्‍यांनी जास्तीत जास्त मृतदेह याच भागातून बाहेर काढले आहेत.

आग वेगाने पसरण्याचे कारण काय?
अधिकार्‍यांनी सांगितले की, पबच्या अंतर्गत सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील साहित्याचा वापर करण्यात आला होता. यामुळे अवघ्या काही मिनिटांतच आग संपूर्ण पबमध्ये पसरली. या आगीचे भीषण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यात पबमधून आगीच्या ज्वाला निघताना आणि लोक जीवाच्या आकांताने ओरडत पळताना दिसत आहेत.
थायलंडमध्ये पबमध्ये  आग लागण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही सुरक्षा नियमांच्या दुर्लक्षामुळे येथे मोठे अपघात झाले आहेत. २०२२ मध्ये एका म्युझिक पबला लागलेल्या आगीत १४ जणांना जीव गेला होता. तर २००९ मध्ये बँकॉकच्या सँतिका नाईटक्लबमध्ये फटाके फोडले जात असताना लागलेल्या भीषण आगीत ६६ जणांचा मृत्यू झाला होता, तर २०० हून अधिक लोक जखमी झाले होते.