मुंबई : राज्यात बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर बारामतीसाठी सुनेत्रा पवार यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी काँग्रेस मात्र बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्यावर ठाम आहे.
राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून माजी मंत्री दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना बुधवारी उमेदवारी जाहीर झाली आहे. ते पुढच्या आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यामुळे याहीवेळी माजी मंत्री प्राजक्त तनुपरे व कर्डिले यांच्यात लढतीची चिन्हे आहेत. अशातच आता बारामती मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने काही उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. पक्षश्रेष्ठींशी याबाबत बोलणे झाले आहे, असे म्हटले जात आहे.
येत्या 2 दिवसांत निवडणूक लढण्याबाबत भूमिका जाहीर
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामती मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. राहुरी आणि बारामती विधानसभेबाबत आमच्या पक्षश्रेष्ठीसोबत बोलणे झाले आहे. यासाठी आमच्याकडे उमेदवारी मागणारे अर्ज आले आहेत. बारामतीसाठी 6 अर्ज आले आहेत आणि राहुरीमधे 4 अर्ज आले आहेत. येत्या 2 दिवसांत आम्ही निवडणूक लढण्याबाबत भूमिका जाहीर करू. यापैकी काही उमेदवारांच्या ऑनलाइन मुलाखती झाल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राहुरी आणि बारामतीसाठी 23 एप्रिलला मतदान होईल तर मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. बारामती मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले होते. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु, कुणी उमेदवार द ेणार असेल, तर आम्ही ताकदीने लढू, असेही स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे आता नेमके काय होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.