जॅकवेलमध्ये पाणी घेण्यास खंडपीठाची संमती

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहराच्या बहुप्रतिक्षित नवीन पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मंगळवारी (दि.१७) मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. १९ रोजी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर जॅकवेलमध्ये पाणी घेण्यास उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर २२ किंवा २३ मार्चपर्यंत जॅकवेल पूर्ण भरल्यानंतर हे पाणी मुख्य जलवाहिनीमध्ये सोडण्याचे आदेश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांनी दिले आहेत.
उच्च न्यायालयाच्या ७ मार्चच्या आदेशानुसार, महापालिका आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी १६ रोजी जॅकवेलची (उपसा विहीर) प्रत्यक्ष पाहणी केली होती. याचा सविस्तर तपशील महापालिकेच्या वतीने अ‍ॅड. संभाजी टोपे यांनी न्यायालयात सादर केला. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, महापालिका अभियंता आणि कंत्राटदार कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सादर केलेल्या अहवालानुसार, जॅकवेलच्या कामात महत्त्वाचे बदल आणि सुधारणा करण्यात आल्या आहेत. जॅकवेलमधील २०० हून अधिक ठिकाणच्या दुरुस्तीपैकी १२० ठिकाणांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम १८ मार्चपर्यंत पूर्ण होणार असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
तीन ठिकाणची गळती थांबवणार
आधी जॅकवेल भरून पाइपलाइनची सफाई करणार आणि नंतरच शहराला पाणी देण्याचा मार्ग मोकळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कंत्राटदाराने बहुतांश गळती सीलबंद केली असून, पुढील दोन दिवसांत उर्वरित तीन ठिकाणांची गळतीही थांबवली जाणार आहे. तसेच घटनास्थळावरून ७५ ट्रक भरेल इतका राडारोडा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. क्रेन हटवून तो भाग सुरक्षितपणे सील करण्यात आला आहे. शिवाय पाइपलाइनसाठी लागणार्‍या ‘कॉन्बेक्स्ट्रा ’ईपी७५’ साहित्याचा तुटवडा होता. आयुक्तांनी स्वतः भरूच (गुजरात) येथील जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधून हे साहित्य उपलब्ध करून दिले आहे.