आमदार प्रशांत बंब यांच्याकडून १०० गोमातांचे दान
खुलताबाद, (प्रतिनिधी) श्री क्षेत्र वेरूळ येथील कैलास आश्रमात स्वामी भागवत नंदगिरीजी महाराज (श्री १००८ महामंडलेश्वर) यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य श्रीमद्भागवत कथेचा समारोप शुक्रवारी भक्तिमय वातावरणात पार पडला. या सप्ताहाच्या निमित्ताने वेरूळ परिसरात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्मिक ऊर्जेचा महासागर लोटला होता.
राधाकृष्ण स्वामींच्या वाणीतून भक्तीचा जागर कैलास आश्रमाचे मठपती अभय नंदगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली १० ते १७ एप्रिल दरम्यान या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राजस्थान येथील प्रसिद्ध वक्ते परमपूज्य गोवत्सलजी श्री राधाकृष्ण स्वामी महाराज यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून श्रीमद्भागवताचे तत्वज्ञान उलगडून सांगितले. ङ्गङ्घमानवी जीवनात सदाचार, कर्तव्य आणि भक्तीमार्गाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे,
असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
-- आमदार प्रशांत बंब यांची मोठी घोषणा --
या सोहळ्याच्या सांगता समारंभाला मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी विशेष उपस्थिती लावली. आश्रमाच्या सेवाकार्याने प्रभावित होऊन त्यांनी १०० गोमाता (गायी) देणगी म्हणून देण्याचा स्तुत्य निर्णय जाहीर केला. त्यांच्या या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
-- भक्ती अन् शिस्तीचा अनोखा संगम --
सप्ताहाच्या काळात सकाळपासून ते रात्रीपर्यंत विविध धार्मिक विधी, हरिनाम जप आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण परिसरात टाळ-मृदुंगाचा गजर आणि वासुदेव हरीच्या घोषाने वातावरण भारावून गेले होते. दरम्यान हजारो भाविकांची निवास, भोजन आणि पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था करण्यात आली होती.












