भापकरांचे स्वप्न आता केंद्रेकरांच्या खांद्यावर! नऊ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी राबविणार विशेष मोहीम

Foto

औरंगाबाद: राज्यात सर्वात कमी वनाच्छादित क्षेत्र असलेल्या मराठवाड्यात वृक्षलागवडीची चळवळ गावागावात पोहोचावी यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी अथक परिश्रम घेतले होते.  गतवर्षी उद्दिष्टापेक्षा ही जास्त वृक्षलागवड करून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कौतुकाची थाप आयुक्त भापकर यांच्या पाठीवर पडली. मराठवाडा वृक्षाच्छादित करण्याचे भापकर यांचे स्वप्न आता आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या खांद्यावर येऊन पडले आहे. या वर्षी मराठवाड्यात 9 कोटी 28 लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे.

मराठवाड्यात वनक्षेत्राचे प्रमाण अत्यल्प आहे. गेल्या दोन तीन दशकात म्हणावि तशी वृक्ष लागवड झाली नाही. त्याचा फटका मराठवाड्याला बसला. पर्जन्यमानात मोठी घट झाली.तत्कालीन विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी सूत्रे स्वीकारताच वृक्षलागवड चळवळीला वेग दिला. आयुक्तालयात वृक्षसंवर्धन कक्ष स्थापन करीत गावागावात वृक्षलागवड चळवळ पोहोचवली. एक मोहीम म्हणून वृक्ष लागवडीवर भापकर यांनी काम केले होते. प्रत्येक जिल्ह्याला, तालुक्याला, गावाला वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देत भापकरांनी वृक्षलागवड चळवळ एक अभियानच बनविले. प्रत्येक अधिकारी -कर्मचार्‍यांना स्वतःच्या गावात जाऊन वृक्ष लागवड करण्याचे आदेश दिले आणि मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली. यावर्षी आता विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या खांद्यावर वृक्षलागवड मोहिनीची धुरा येऊन पडली आहे. मराठवाड्यात 9 कोटी 28 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. मराठवाड्याला पाणीदार करण्यासाठी वृक्ष लागवडीशिवाय पर्याय नाही. केंद्रेकर यांनी वृक्ष लागवड चळवळीला व्यापक स्वरूप देणार असल्याचे जाहीर केले. त्याच बरोबर विशेष मोहीमही राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करू असा दावा आयुक्तांनी केला आहे. वनवनमंत्र्यांची आढावा बैठक आता 10 जूनला दरम्यान, वित्त तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार काल विभागीय आयुक्तालयात वृक्षलागवड मोहिमेची आढावा बैठक घेणार होते. मात्र काही कारणास्तव त्यांचा दौरा रद्द झाला. आता येत्या दहा जून रोजी वनमंत्री आयुक्तालयात बैठक घेणार आहेत. गतवर्षी वनमंत्र्यांनी मराठवाड्यातील वृक्षलागवड मोहिमेचे कौतुक केले होते  तसेच तत्कालीन आयुक्त भापकर यांच्यासह वृक्ष लागवड मोहिमेतील सर्वच अधिकार्‍यांचा त्यांनी गौरव केला होता. त्यामुळे यावर्षी आयुक्त केंद्रेकर यांच्यावर वृक्षलागवडीचा निश्चितच दबाव असणार यात शंका नाही.