छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) ः दरमहा जमा होणारी भिस्सीची रक्कम महिलांना न देता तब्बल २ कोटी ९९ लाख २० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी महिलेवर मुकूंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नंदाबाई रमेश आधुडे, मुलगा सौरभ रमेश आधुडे रा. व्यंकटेश पार्क बीड बायपास असे आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी जयश्री गजानन गिरी रा. संतोषीमातानगर मुकूंदवाडी यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, सन २०१८ पासून फिर्यादी महिलेने व्यवसायातून येणारे पैसे भिसीद्वारे आरोपी महिलेकडे जमा केले होते. नोव्हेबर २०२२ पर्यंत १० लाख रूपये जमा केले.
तर त्यानंतर आरोपी महिलेने १२ लाख रूपयांची नवीन भिस्सी सुरू केली. त्यात फिर्यादींनी ५ नंबर टाकून दरमहा ५० हजार रूपये जमा केले. असे जवळपास २० लाख रूपये आरोपी महिलेकडे जमा केले. त्याचप्रमाणे प्रकाश रणमोडे यांनी १४ लाख, नमिता अंकूश बेंद्रे यांनी १७ लाख ५० हजार, विलास माने यांनी ३० लाख, नंदा बेंद्रे यांनी १५ लाख ५० हजार, चांदबी पठाण यांनी ८ लाख, सावित्री आघाव १९ लाख ८० हजार, ज्योती घोलप यांनी २ लाख ७० हजार, छाया चव्हाण ७ लाख ९० हजार, जिजा काळे ६ लाख ५० हजार, गुलाब राठोड १५ लाख ५० हजार, कमलबाई सुरसे यांनी २१ लाख ५० हजार, रंजना आघाव १६ लाख २० हजार, सपना मरकड ५० लाख, मीरा फलके ५० लाख, राम घायाळ ४ लाख यांनी जमा केलेले तब्बल २ कोटी ९९ लाख २० हजार रूपयांची फसवणूक केली. पुढील तपास मुकूंदवाडी ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बहुरे हे करीत आहेत.











