संपत्तीच्या वादातून भोसकाभोसकी; एक ठार, तीनजण गंभीर जखमी; शेंद्रा एमआयडीसीतील घटना !

Foto

औरंगाबाद : संपत्तीच्या वादातून शेंद्रा एमआयडीसीमध्ये बुधवारी रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यावेळी चाकूने भोसकल्याने एक जण जागीच ठार झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिझवान खान रशीद खान (वय 32 वर्षे, रा. उस्मानपुरा) असे या हाणामारीत ठार झालेल्या तरुणाचे नाव असून, तो सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. मेहराज खान रशीद खान (वय 28 वर्षे), आवेज खान दोस्त मोहम्मद खान व आदिल खान नसीर खान हे तीनजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना रोडवरील शेंद्रा एमआयडीसीत नूर इंटरप्राईजेस नावाची एक कंपनी आहे. ती सध्या अब्दुल गणी कुरेशी यांच्या ताब्यात आहे. त्या कंपनीच्या मालकीवरून काही दिवसांपासून खालीद अबु तुराब व अब्दुल गणी कुरेशी यांच्यात वाद सुरू होता. या कंपनीत रिझवान खान रशीद खान हा गेल्या दहा वर्षांपासून सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता. 

काल बुधवारी नेहमीप्रमाणे रात्रपाळीच्या ड्युटीसाठी रिझवान खान हा कंपनीत गेला होता. त्यावेळी रात्री नूर इंटरप्राईजेस कंपनीत कार (क्रमांक एम. एच. 20/सी. एल. 9500) मधून पाच ते सहा जण उतरले. त्यांनी गाडीतून उतरताच आरडाओरड करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कंपनीच्या गेटवर असलेल्या रिझवान खान याने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील आलेले सर्व जण चाकू व रॉड घेऊन कंपनीत घुसले. काही कळण्याच्या आत त्यांनी कंपनीत धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना अडवण्यासाठी रिझवान खान व त्याचा भाऊ मेहराज खान गेले. खालिद अबू तुराब, शेख अब्दुल माजीद शेख अब्दुल हमीद, आवेज खान दोस्त मोहम्मद खान, आदिल खान नसीर खान, कैसर कुरेशी यांनी दोन्ही भावंडावर सपासप चाकूने वार केले. त्यात रिझवान खान व त्याचा भाऊ मेहराज खान हे रक्‍ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले. ही माहिती आजूबाजूच्या कंपनीतील सुरक्षारक्षकांनी चिकलठाणा पोलिस ठाण्याला कळवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून नूर इंटरप्रायजेस कंपनीत धाव घेतली. त्यावेळी दोन गटात वाद सुरू होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटांना शांत करत जखमींना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात आणताच रिझवान खान याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिकलठाणा पोलिसांनी रात्रीच दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.विशाल नेहूल यांनी दिली. अधिक तपास चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले करत आहेत.

घाटीत तणाव
या प्रकरणातील मृत रिझवान खान रशीद खान याच्या सर्व मारेकर्‍यांना त्वरित अटक करा, अशी मागणी करत रिझवानच्या नातेवाईकांनी आज सकाळी त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे घाटीत काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिस उपअधीक्षक डॉ.विशाल नेहूल यांनी मध्यस्थी करत रिझवानच्या नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर तणाव निवळला.