पैठण, (प्रतिनिधी) : तालुक्यातील बिडकीन डीएमआयसी औद्योगीकरणाकडे झपाट्याने झेप घेत आहे. या डीएमआयसीमध्ये सर्वप्रथम पैठण तालुक्यातील भूमिपुत्रांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे तो भूमिपुत्रांचा पहिला मान आहे, असे प्रतिपादन मनसे नेते तथा माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर यांनी पैठण येथे मनसेच्या निर्धार मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.
याप्रसंगी व्यासपीठावर संभाजीनगर संपर्क प्रमुख दिलीप चितलांगे, बिपीन नाईक, नांदेडचे जिल्हा संपर्क नेते सतनामसिंग गुलाटी, नितीन शेळके, भगवान खाटीक, मनोज मुरदारे, श्रीनाथ गोसावी समृद्धी गोसावी यांची उपस्थिती होती. पैठण तालुक्यातील डीएमआयसी व इतर औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या काळात प्रचंड औद्यगीक विकास होणार आहे.
आणि या औद्योगिक विकासात स्थानिक भूमिपुत्रांना प्रथमतः रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी व त्यानंतर इतरांचा विचार करण्यात यावा, आमचा इतरांना विरोध नाही, पण पहिला हक्क हा भूमिपुत्रांचाच असतो आणि तो भूमिपुत्रांनाच मिळाला पाहिजे असे रोखठोक विचार या मेळाव्यात नांदगावकर यांनी मांडले. यावेळी बोलताना ते म्हणाले की पस्तीस वर्षापासून सत्तास्थानी असलेल्या राज्यकर्त्यांना तालुक्याचा विकास करता आला नाही पैठण तालुक्यात ज्ञानाची गंगा आणण्या ऐवजी मद्याची गंगा आणली असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
असलेल्या पैठणीचे महत्त्व कळले नाही. येवलेकरांनी त्याचा फायदा करून घेतला आहे, असा टोमणाही त्यांनी मारला. यावेळी बोलताना संभाजीनगर जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप चितलांगे म्हणाले की, पैठण शहर हे ऐतिहासिक शहर आहे. या शहराला इतिहास आहे. तसेच मनसेचा इतिहास आहे. या तालुक्याने दोन जिल्हा परिषद सभापती, पंचायत समिती सभापती दिले आहे. विधानसभा निवडणुकीतही थोड्या मताने उमेदवाराचा पराभव झाला आहे.
या शहरात राज्यकर्त्यांची दहशत असताना येथील कार्यकर्त्यांनी दहशतीला न घाबरता निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे. हे कौतुकास्पद आहे. मनसेचा मागील इतिहासाचा वारसा पुन्हा उभा करायचा आहे. कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून पक्ष संघटनेसाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. मेळाव्याच्या प्रारंभी प्रा. शिवाजी भादे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. याप्रसंगी मनसेच्या महिला नेत्या भारती भोज, संतोष कुलकर्णी, शकील खलिफा, योगेश टाक आदींसह मनसेच्या महिला व पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












