पंढरपूर तालुक्यात मोठी दुर्घटना! आंबे गावात विहीर कोसळली, चार मजूर जिवंत गाडले, बचावकार्याला वेग

Foto
सोलापूर: पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे भयंकर दुर्घटना घडली. काम सुरू असताना विहीर कोसळल्याने चारजण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली. बचावासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून लवकरच एनडीआरएफची टीम दाखल होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबे येथे निवास शिंदे या शेतकऱ्याच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू होते. ३० फुटाची विहीर खोदण्यात येत होती. विहीर खोदताना अचानक दगड मातीचा ढिगारा काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर कोसळला. कामगारांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. हे कामगार सध्या दगड, मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. जेसीबीने दगड-मातीचा ढिगारा हटवण्यात येत आहे. लवकरच एनडीआरएफची टीम दाखल होणार असल्याचे तहसीलदार सचिन लंगोटे यांनी सांगितले. या दुर्घटनेत नेमके किती कामगार अडकले आहेत, तसेच त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नाही.