क्रेडाईच्या एक्स्पोचा झाला महाफियास्को

Foto

अधिकारी, राजकीय नेत्यांपाठोपाठ नागरिकांनीही फिरवली पाठ

औरंगाबाद, (सांजवार्ता ब्युरो) : दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर शहरात क्रेडाईच्या वतीने भरविण्यात आलेल्या एक्स्पोकडे जिल्ह्यातील वरिष्ठ आयएएस, आयपीएस अधिकार्‍यांनी क्रेडाईच्या विश्वासाहर्तेवर शंका घेऊन उद्घाटन समारंभाकडे पाठ फिरविली होती. त्यानंतर  लोकप्रतिनिधीच नव्हे तर पक्षांच्या पदाधिकार्‍यांसमोर लोटांगण घालून निमंत्रण पत्रिकेत त्यांचे फोटो छापून येण्याची गळ घातली. परंतु त्यातीलही काहींनी प्रदर्शनाकडे ढुंकूनही पाहिले नाही. पण ज्यांच्यासाठी क्रेडाईने मोठा गाजावाजा करून प्रदर्शन भरविले. त्या सर्वसामान्य नागरिक, ग्राहकांनीही प्रदर्शनाकडे पाठ फिरविली. सांजवार्ता टीमच्या चमूने प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली असता  शुकशुकाट दिसून आला. त्यामुळे क्रेडाईच्या महाएक्स्पोचा फियास्को उडाल्याचे दिसून आले.
क्रेडाईने आयोजित एक्स्पोला यंदा चांगलेच ग्रहण लागले आहे. त्याला कारणही तसेच आहे. शहरातील काही बांधकाम व्यावसायिकांनी व्यवसायातील आपली विश्वासार्हताच घालवली आहे. यातून काहींना तर चक्क सहा-सहा महिने जेलची हवाही खावी लागली. एकाने तर जीवन संपवले. अशा विश्वासहीन क्रेडाईच्या महाएक्स्पोला सामान्य नागरिकांनी पाठ दाखवली तर चुकले कुठे?


सुविधांचा अभाव

क्रेडाईच्या एक्स्पोला नागरीक गृह खरेदीसाठी भेटी देत असतात. तेथे येणार्‍या ग्राहकाच्या सुविधेसाठी एका कोपर्‍यात टॉयलेट (मुतारी) उभारण्यात आले. पण या टॉयलेटची घाण सर्व मैदानात पसरली आहे. त्यामुळे प्रदर्शन परिसरात दुगर्ंंधी पसरली आहे. येथे येणार्‍या नागरिकांना नाक दाबून प्रदर्शन पाहावे लागत आहे. वास्तविक बांधकाम व्यावसायिकांचे हे प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन पाहणार्‍यांसाठी उभारण्यात आलेली मुतारी ही मंडळी जर व्यवस्थित उभारू शकत नाही तर चांगली घरे कशी उभारतील, असे नागरिकांमध्ये बोलले जात होते.


पर्दाफाश करणार!

सांजवार्ताने याबद्दल क्रेडाईच्या क्रेडिटीबिलिटीवर शंका या मथळ्याखाली दोन दिवसांपूर्वी वृत्त दिले होते. हे वृत्त प्रकाशित होताच अनेकांनी सांजवार्तात फोन करून, प्रत्यक्ष भेटून वेगवेगळ्या बांधकाम व्यावसायिकांनी आपल्याला कसे फसवले याची जंत्रीच सांजवार्तासमोर मांडली. एवढेच नव्हे तर काहींनी वैयक्तिक व्यवहार, व्याजाने घेतलेले व्यवहार, शब्द फिरवलेले व्यवहार आदी बद्दल माहिती दिली. सांजवार्ता कोणाच्याही वैयक्तिक भानगडीमध्ये कधीही पडत नाही आणि पडणारही नाही. परंतु सदनिका खरेदी करणार्‍या जनसामान्यांना दिलेल्या शब्द जर पाळला नाही तर सांजवार्ता त्याच्यासोबत हिरहिरीने उभा राहून नियम मोडणार्‍या व्यावसायिकाचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही.

क्रेडाईचा महाएक्स्पो जनतेसाठी की मलिदा लाटून पदाधिकार्‍यांच्या उदोउदोसाठी

क्रेडाईच्या महाएक्स्पोचे आयोजन पदाधिकार्‍यांच्या उदोउदोसाठी व मलिदा लाटण्यासाठी असल्याची शंका तेथे लावलेल्या बांधकाम व्यावसायिक स्टॉल धारकांनी सांजवार्ता चमूकडे बोलून दाखवली. त्याला कारणही तसेच आहे. क्रेडाईने प्रत्येक स्टॉलला अंदाजे पाच दिवसांसाठीे १ लाखापेक्षा जास्तीचे भाडे आकारले आहे. समोरच्या रोसाठी त्याहूनही जास्तीचे भाडे असल्याची माहिती हाती लागली आहे. स्टॉल धारकांनी अव्वाच्या सव्वा भाडे भरूनही त्यांना पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. एका स्टॉल धारकाने तर मला अद्याप एकही बुकिंग मिळाली नसल्याची खंत आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली. तर दुसरीकडे क्रेडाईचे पदाधिकारी प्रसारमाध्यमांना हाताशी धरून स्वतःचा फोटो छापत उदोउदो करून भरपूर प्रतिसाद मिळाला, एवढ्या बुकिंग झाल्या अशा शेखी मिरवल्या हे सर्वश्रुत आहे.

कशाला पाहिजे बाऊन्सरचा थाट 

क्रेडाईच्या वतीने सुरू असलेले ड्रीम होम प्रदर्शनात उद्घाटनाच्या दिवशी पासून बाऊन्सर ठेवण्यात आले आहेत. परंतु दांडिया महोत्सव किंवा इतर सेलिब्रिटी येणार्‍या कार्यक्रमात काही गैरप्रकार होऊ नये यासाठी बाऊन्सरला बोलविण्यात येत असते. परंतु क्रेडाईच्या सुरू असलेल्या ड्रीम होम प्रदर्शनात चक्क बाऊन्सरचा थाट दिसून येत आहे. खर तर या प्रदर्शनात घर खरेदीसाठी लोक येणार आहेत. गोंधळ होण्याचा कुठलाही प्रश्न नाही. त्यामुळे बाऊन्सरचा थाट कशासाठी? घातला गेला असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. आपल्या स्वप्नातील घर अशी संकल्पना या क्रेडाई संघटनेने ठेवण्यात आली आहे. परंतु स्वप्नांचे घर शोधण्यासाठी येणार्‍या सर्वसामान्य ग्राहक गोंधळ थोडी घालणार आहेत? त्यामुळे बाऊन्सरचा थाट नेमका कुणाला दाखविण्यासाठी घातला आहे. यावर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाएक्स्पोचे प्राईम टाईमचे (सायं. ६ ते ७) चालते-बोलते छायाचित्र

८ क्रेडाई पदाधिकार्‍यांनी गमवलेल्या विश्वासार्हतेमुळे सामान्य नागरीकांनीही  महाएक्स्पोकडे ढुंकूनही बघितले नाही. लाखो रुपये खर्च करून स्टॉल लावलेल्या बांधकाम प्रकल्पाच्या स्टॉलमध्ये असा शुकशुकाट दिसून आला.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker