बिहारमधील सामूहिक हत्याकांड : आरोपींना संभाजीनगरमध्ये बेड्या

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : बिहारमध्ये आपल्या सख्ख्या भावासह कुटुंबाची निघृणपणे हत्या करून पसार झालेल्या दोन मुख्य आरोपींना छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. बिहार पोलिसांच्या एका फोननंतर स्थानिक पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत अवघ्या काही तासांत या नराधमांना गजाआड केले. न्यायालयाने ट्रान्झिट रिमांड मंजूर केल्यानंतर दोन्ही आरोपींना बिहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
दीपक देवसिंग राजपूत (वय २७, मूळ रा. नाचनवेल, ता. कन्नड, ह.मु. जाधववाडी) आणि गौतम ऊर्फ राहुल गुप्ता (वय २२, रा. रामगढ, जि. कैमूर, बिहार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.
असा लागला छडा
सामूहिक हत्याकांडाच्या तपासादरम्यान मुख्य आरोपी छत्रपती संभाजीनगरमध्ये लपल्याची गुप्त माहिती बिहार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार १६ मे रोजी कैमूरचे (बिहार) पोलीस अधीक्षक यांनी थेट छत्रपती संभाजीनगरचे परिमंडळ-१ चे उपायुक्त पंकज अतुलकर आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त रत्नाकर नवले यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. बिहार पोलिसांचे पथक तात्काळ पोहोचू शकत नसल्याने त्यांनी स्थानिक पोलिसांकडे मदतीची मागणी केली. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुन्हे शाखेला तत्काळ कारवाईचे
आदेश दिले. तांत्रिक विश्लेषण करून अवघ्या काही तासांतच जाधववाडीतील शरद टी परिसरातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
घरगुती वादातून धक्कादायक हत्याकांडः
पोलीस तपासात समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. आरोपी राहुलचा मोठा भाऊ विकास हा मुंबईत कामाला होता. त्यांचा सख्खा भाऊ कृष्ण मुरारी याने ४ मे रोजी आईला मारहाण केली होती. आईने ही माहिती फोनवरून विकासला दिली. याचा राग आल्याने विकासने त्याचा मित्र दीपक राजपूतला बिहारला बोलावून घेतले. ७ मे रोजी विकास, दीपक आणि राहुल यांनी मिळून कृष्ण मुरारी, त्याची पत्नी दुर्गेश, तसेच दुपारी शाळा सुटून आलेली ८ वर्षांची चिमुकली अंश आणि ४ वर्षांचा प्राची या संपूर्ण कुटुंबाची गळा चिरून निघृण हत्या केली. ओळख पटू नये म्हणून त्यांची मुंडकी कापून वेगळ्या ठिकाणी फेकली. चारही मृतदेहांचे तुकडे सुटकेसमध्ये भरून ते दुर्गावती नदीत फेकून दिले.
आई आणि पत्नीला ठेवले होते डांबून
हत्याकांड सुरू असताना घरात विकासची अल्पवयीन नवविवाहित पत्नी आणि वृद्ध आई उपस्थित होत्या. मात्र, आरोपींनी त्यांना दुसऱ्या खोलीत कोंडून ठेवले होते. हत्येनंतर दीपक आणि राहुल छत्रपती संभाजीनगरला पळून आले व शेंद्रा एमआयडीसीत लपून काम करू लागले होते. अखेर स्थानिक पोलिसांनी त्यांना शोधून काढले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions