करमाडजवळील अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Foto
करमाड, (प्रतिनिधी)  : छत्रपती संभाजीनगर- जालना महामार्गावर रविवारी - (ता. चार) मध्यरात्री एकला दुचाकीने अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीचालकाचा मृत्यू तर एकजण जखमी झाला. 

ही घटना करमाड येथील आराध्या हॉटेलसमोर, शेंद्रा एमआयडीसी पुलाजवळ घडली. श्लोक सतीश अकोलकर (वय २२) आणि प्रदून्य मकरंद नाईक (वय १८, दोघे रा. जालना) हे दुचाकीवरून (क्र. एमएच २१ बीटी ३१४८) छत्रपती संभाजीनगरकडून जालन्याकडे जात होते. आराध्या हॉटेलसमोर शेंद्रा एमआयडीसी पुलाजवळ त्यांच्या
दुचाकीसमोर अचानक अज्ञात वाहन आल्याने दुचाकीची त्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक झाली. 

धडकेनंतर दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यात श्लोकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. माहिती मिळताच नरेंद्राचार्य महाराज संस्थेच्या रुग्णवाहिकेचे चालक बाळू कातखडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही जखमींना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले.

 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर श्लोकला मृत घोषित केले. प्रदून्यवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी करमाड पोलिसांनी गुन्हा नोंदवून अज्ञात वाहनाचा तपास सुरू केला आहे.