बोलेरो पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Foto
सिल्लोड शहरातील डोंगरगाव फाटा येथे अपघात

सिल्लोड, (प्रतिनिधी) : पालोद येथुन सिल्लोड येथे कामानिमित्त स्कुटी वर जाणाऱ्या एका डॉक्टरला सिल्लोड येथून डोंगरगाव ला जाणाऱ्या भरधाव बोलेरो पिकअपने स्कुटीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात डॉक्टर इसम जागीच ठार झाले. 

ही घटना मंगळवारी (दि.१७) दुपारी २ वाजेच्या दरम्यान घडली. या अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव डॉ. विश्वास शेषराव पालोदकर वय ४८ रा पालोद ता सिल्लोड असे आहे. डॉ. विश्वास हे पालोद येथून सिल्लोड येथे काही कामानिमित्त त्यांच्या गाडीवरुन (स्कुटी क्र. एम. एच २० एफ ई ३२८४: वरून येत होते.

त्यातच शहरातील डोंगरगाव फाट्याजवळ सिल्लोडकडून डोंगरगाव येथे भरधाव वेगाने जात असलेली बोलेरो पिकअप (क्र. एम. एच. ४८ बिएम २९५६) ने स्कुटीला जबर धडक दिली. या धडकेत डॉ. विश्वास हे जागीच ठार झाले धडक इतकी भीषण होती की पिकअप ने स्कुटीस सुमारे १०० फूट फरपटत नेले. यातच डॉ. विश्वास यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षण शेषराव उदार घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त डॉ. विश्वास यांना उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी डॉ. विश्वास यांना तपासून मृत घोषित केले. 
जिल्हा रुग्णालय येथे डॉ विश्वास यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पालोद येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात मंगळवारी रात्री १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ विश्वास यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून अधिक तपास शहर पोलीस करीत आहे.