आळंद येथे भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; चुलत भाऊ जखमी

Foto
फुलंब्री, (प्रतिनिधी) : भरधाव कारने पाठीमागून इलेक्ट्रिक स्कुटीला दिलेल्या जोरदार धडकेत गंभीर जखमी झालेल्या दोन चुलत भावांपैकी १९ वर्षीय तरुणाचा रविवारी (दि.२०) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्याचा चुलत भावावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. शनिवारी (दि. १९) दुपारी सव्वादोनच्या सुमारास आळंद येथे हा भीषण अपघात झाला.

रोहित डकले (वय १९) असे तरुणाचे नाव आहे. निखिल डकले याच्यावर उपचार सुरू आहे. रोहित डकले आणि निखिल डकले हे दोघे चुलत भाऊ इलेक्ट्रिक स्कुटीवरून आळंदच्या दिशेने जात होते. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कारने (एमएच ०३ डीजी ३३२६) त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. 

धडक इतकी भीषण होती की, कारने स्कुटीला सुमारे शंभर फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. यात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमींना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी निखिलवर उपचार सुरू आहे. दरम्यान, रोहित डकले याच्यावर सोमवारी (दि. २१) सकाळी १० वाजता गेवराई गुंगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.