बिडकीन बँकेकडून ७० लाखांच्या ठेवींची फसवणूक; संचालकांसह चौघांविरुद्ध गुन्हा

Foto
वाळूज महानगर, (प्रतिनिधी): बिडकीन अर्बन मल्टिपर्पज निधी लिमिटेड बँकेच्या शेंदूरवादा शाखेत ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी परत न करता आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँकेच्या दोन संचालकांसह चार जणांविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण ७० लाख ३१ हजार ४०० रुपयांच्या ठेवी परत न न केल्याचा आरोप आहे.

आरोपींमध्ये संचालक शिरीष सुधाकरराव देशमुख, स्वप्निल शिरीष देशमुख, विकास कृष्णराव गोरडे (सर्व रा. बिडकीन, ता. पैठण) आणि शाखा व्यवस्थापक योगेश राजाराम निकम (रा. शेंदुरवादा, ता. गंगापूर) यांच्यासह इतरांचा समावेश आहे. याप्रकरणी नारायण विश्वल हाडोळे (वय ३१, रा. धामोरी, ता. गंगापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३१८(३), ३(५) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे रक्षण अधिनियम (एमपीआयडी) कलम ३ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, १३ फेब्रुवारी २०२३ ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आरोपींनी संगनमत करून बँकेत ठेवी स्वीकारल्या. यामध्ये फिर्यादीने स्वतः ची १ लाख ६३ हजार ६२७ रुपयांची, तर इतर ठेवीदारांनी ६८ लाख ३७ हजार ७७३ रुपयांची गुंतवणूक केली. 

अशा एकूण ७० लाख ३१ हजार ४०० रुपयांच्या ठेवींची मुदत संपल्यानंतरही रक्कम परत करण्यात आली नसल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. ठेवीदारांनी वारंवार पैशांची मागणी करूनही त्यांना रक्कम मिळाली नाही. अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

त्यानंतर वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैशाली गुळवे पुढील तपास करीत आहेत. या प्रकारामुळे शेंदुरवादा परिसरातील ठेवीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, बँकेत ठेवी असलेल्या अन्य ग्राहकांकडूनही तक्रारी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.