मोफत रेशनचा काळाबाजार उघड

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शासकीय योजनेंतर्गत गरिबांसाठी येणार्‍या मोफत रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणार्‍या टोळीवर गुन्हे शाखेने शनिवारी (१३ जून) रात्री साडेअकराच्या सुमारास मोठी कारवाई केली. जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकलेल्या या छाप्यात सुमारे १५ लाख ७५ हजार रुपयांचा धान्यसाठा, आयशर ट्रक आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन मुख्य आरोपींना ताब्यात घेतले असून, इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली होती की, समीर कुरेशी आणि फहाद शुत्तारी हे रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी आयशर ट्रकमध्ये लोड करत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून तिघांना रंगेहात पकडले. समीर बाबर कुरेशी (रा. चिकलठाणा), फरदीन गणी पठाण (रा. चिकलठाणा) व फहाद लईक शुत्तारी (रा. किराडपुरा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, तर आवेज कुरेशी, कलीम छोटू कुरेशी व त्याचे इतर साथीदार फरार झाले. पोलिसांनी कारवाई दरम्यान एकूण १५ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.