छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी सातारा : साताऱ्यात सुरू असणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना एका तरुणाने काळे फासण्याचा प्रकार घडला. संबंधित तरुणाचे नाव संदीप जाधव असून काळे फासण्यामागील कारण लगेच स्पष्ट झाले नाही. पण, पोलिसांनी जाधवला ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकारामुळे संमेलनस्थळी एकच खळबळ उडाली.
सातारा शहरात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी संदीप जाधव हा तरुण कार्यक्रमस्थळी आला होता. आल्यानंतर त्याने संमलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना काळे फासले. त्यानंतर ‘जय जवान, जय किसान’ अशी घोषणा दिली. तसेच राष्ट्रगीतही म्हटले.
संदीप जाधवने कोणत्या कारणातून काळे फासण्याचा प्रकार केला हे स्पष्ट झाले नव्हते. पोलिसांनी जाधवला ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडील माहितीनुसारच यामागील कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान या प्रकाराचा कुलकर्णी यांनी निषेध केला. किती लोक होते ते माहिती नाही, मी त्यांना ओळखत नाही. याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली जात आहे. ते म्हणाले, साहित्यिक संस्थेत राजकीय हस्तक्षेप नको ही माझी भूमिका ठाम आहे. मी साहित्य सेवेसाठी काम करतो आहे. विचाराची लढाई विचाराने करावी. या कार्यकर्त्याने यापूर्वीही वेगवेगळ्या घटनेत अशा प्रकारचे कृत्य केले आहे. पोलिस पकडण्यासाठी येताच जण गण मन म्हणण्याची त्याची पद्धत आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात पोलिसांना मर्यादा येतात असेही सांगितले.