बोधेगावच्या मुख्य रस्त्याला तलावाचे स्वरूप

Foto
प्रशासनाचे दुर्लक्ष, वाहन चालवणे कठीण; नागरिकांचे हाल

फुलंब्री, (प्रतिनिधी) : तालुक्यातील खामगाव फाटा ते बाबरा रस्त्यावरील बोधेगाव पासून एक किमी अंतरावर शेत बांधप्रमाणे माती लावल्याने मुख्य रहदारारीच्या रस्त्यावरच पाऊसाचे पाणी साचल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. 

यामुळे वाहनधारकांना व ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर पाणी
साचल्याने येथील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था समोर आली आहे. रस्ते खड्डे आणि चिखलाने भरलेले असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांसाठी ते त्रासदायक ठरत आहे. येथील जिल्हा परिषद शाळेतील लहान विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी तुडुंब भरलेल्या पाण्यातुन वाट शोधावी लागत आहे. 

ज्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. गावकऱ्यांच्या मते, गावातील मुख्य रस्त्याची ही अवस्था प्रशासनाच्या दुर्लक्षाचे स्पष्ट उदाहरण आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि नागरिकांचे कल्याण धोक्यात आले आहे. प्रशासनाने तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करून सुकर मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.