छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या सतरा वर्षीय मुलाचा केसापुरी तांडा येथील डोंगरात मृतदेह आढळला. प्रथमेश कांतीलाल गायकवाड (१७, रा. रमानगर, क्रांतीचौक) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश अकरावीचा विद्यार्थी होता. रविवारी तो पाच ते सहा मित्रांसह केसापुरी तांडा परिसरातील डोंगरावर फिरण्यासाठी गेला होता. संबंधित ठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे दीड किलोमीटरचा पायी डोंगर प्रवास करावा लागतो. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास प्रथमेश डोंगराच्या कपारीत पडलेल्या अवस्थेत आढळला. त्याच्या
मित्रांनी आणि ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच दौलताबाद पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अशोक सोनवणे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. दुर्गम भागातून प्रथमेशला बाहेर काढण्यासाठी पोलिस आणि ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागली. त्याला शासकीय घाटी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. प्रथमेशच्या मृत्यूचे कारण अजून समजलेले नाही. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असून त्याच्यामागे आई-वडील आणि एक बहीण आहे. वडील कुरिअर रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions












