उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने बोगस रेशनकार्ड

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे बनावट पिवळे रेशन कार्ड तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत हे कार्ड दाखवून खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर, हे रेशन कार्ड बोगस असल्याचे निष्पन्न झाले असून अन्नधान्य वितरण अधिकार्‍यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दि. १२ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड माध्यमांना दाखवले होते. या कार्डवर एकनाथ संभाजी शिंदे (रा. आंबेडकरनगर) असे नाव असून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावेदेखील नमूद करण्यात आली होती. या कार्डवर कार्यालयाचे बनावट गोल शिक्के आणि सक्षम अधिकार्‍याची खोटी स्वाक्षरी असल्याचे दिसून आले. या गंभीर प्रकरणाची दखल घेत प्रशासनाने तत्काळ तपासणी सुरू केली. रेशन कार्डवर नमूद असलेल्या आधार कार्ड क्रमांकानुसार ऑनलाइन प्रणालीमध्ये तपासणी केली असता, असे कोणतेही रेशन कार्ड अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले.
हस्तलिखित शिधापत्रिका बंद
शासकीय योजना लाटण्यासाठी अज्ञात आरोपीने हे बनावट रेशन कार्ड तयार केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून शासनाने हस्तलिखित शिधापत्रिका देणे पूर्णपणे बंद करून केवळ मऑनलाईन प्रिंटेडफ कार्ड देण्यास सुरुवात केली आहे. तरीही हे कार्ड हाताने लिहिलेले असल्याने आणि त्यावर बनावट शिक्के व स्वाक्षरी असल्याने प्रशासकीय चौकशीत या फसवणुकीचा भांडाफोड झाला.