धामणगाव रेल्वे (अमरावती) - शेगाववरून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्धा जात असताना धामणगाव जवळ चॅनल ९७ येथे झालेल्या अपघातात वर्धा येथील पाच जण जागीच ठार तर २१ जण गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री एक वाजता दरम्यान घडली. जखमींना तातडीने धामणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तर रुग्णालयात उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ७ वर पोहोचली आहे.
मृतकामध्ये दत्ता कुरसंगे (५५, प्रवीण बकाने (५०), घनश्याम पाटील (६०), गोलू उर्फ सचिन बादलमवार (३८) ओम गावंडे (२२) यांचा समावेश आहे. हे सर्वजण सोमनाथ लेआउट सिंधी मेघे येथील रहिवासी होते. तर गंभीर जखमींमध्ये दिनेश रामकृष्ण पोहणकर (३५), नरेंद्र प्रल्हाद संयाम (४९), मुनेश्वर देवराव ढोले (५३), सागर मुनेश्वर ढोले (२७), रोशन राऊत (२६) सतीश वसंत राऊत (४३) सतीश पांडुरंग खाडे (३५), अनिल मारोतराव मसराम (४७) दिनेश पांडुरंग नानवटे (४०), नयन सुधीर खानजोडे (२९), यश रवी मलकापुरे (३०) अमित अनिल आडे (२५) यांचा समावेश आहे. हे सर्वजण सोमनाथ लेआउट सिंधी मेघे वर्धा येथील आहे. तर किरकोळ जखमींमध्ये प्रतिक रामदास शिरसकर (३१), अनुज अनिल आडे (२३), दुर्गेश यशवंत भिसेन (३०), आर्यन प्रभाकर वैद्य (१९) शुभम शामसुंदर ढबाले (३०), प्रणय प्रभाकर ढोले (३३) हे सर्व सोमनाथ ते लेआउट सिंधी मेघे येथील रहिवासी आहे.
असा घडला अपघात
वर्धा येथील हे भाविक शेगाव येथून दुर्गा देवी घेऊन बोलोरो पिकप क्रमांक एम एच ०५ बी एच ५७९३ ने मागच्या बाजूला ट्रॉली लावून वर्धा येथे धीम्या गतीने जात होते दरम्यान याच वेळी सोळा चक्के ट्रॅक क्रमांक सी जी ०७ सी झेड ८८५५ ने मागून धडक दिली या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले गंभीर जखमींना सावंगी मेघे येथील रुग्णालयात हलविण्यात आले यातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे
धामणगावच्या नगराध्यक्ष धावल्या मदतीला
या भीषण अपघाताची माहिती मिळताच नगराध्यक्ष अर्चना अडसड रोठे यांनी ग्रामीण रुग्णालय येथे तातडीने धाव घेतली जखमी असलेल्या रुग्णांना वाहनाची उपलब्धता करत सावंगी मेघे येथील रुग्णालयात हलविण्यात मदत केली दरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ महेश पाटील, पोलीस अधीक्षक अनिकेत कदम चांदूर रेल्वेचे पोलीस उपविभागीय अधिकारी गिरीश ताथोड यांनी रात्री घटनास्थळावर भेट दिली दत्तापूरचे पोलीस निरीक्षक गजानन मेहत्रे मंगरूळ दस्तगीरचे पोलीस निरीक्षक आत्राम यांनी घटनास्थळावर धाव घेतली.
दरवर्षी समृद्धीनेच प्रवास
या दुर्गा मंडळाचे हे ८ वे वर्ष आहे. गत ५ वर्षांपासून ही मंडळी समृद्धी मार्गानेच मूर्ती घेऊन येत असतात. मूर्ती सोबत असल्याने डोळ्यात तेल घालून व दक्ष राहून प्रवास केल्या जातो. यावेळी १४ फूट उंचीची दुर्गामाता मूर्ती सोबत होती. सर्व ती काळजी घेऊन कंटाळवाना म्हणता येईल असा हा प्रवास भक्तिमय भावनेत सूरू. पण काळ गावाजवळ येऊन वाट बघत आहे, अशी सूतराम शंका कोणास आली नाही. सर्व २० ते २५ या वयोगटातील व विविध व्यवसाय करणारे. या मंडळाचा उत्सव भव्य मूर्ती व विविध उपक्रम असल्याने शहरात लोकप्रिय म्हटल्या जातो.