काश्मीरमधील पुलवामा येथे बारा दिवसांपूर्वी सुरक्षा जवानांच्या बसवर दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला होता. त्यात 44 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला आज भारतीय हवाई दलाने दहशतवादी अड्ड्यांवर बॉम्ब वर्षाव करीत घेतला. या हल्ल्यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे बोलले जात आहे. आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास हवाई दलाने अवघ्या 21 मिनिटात ही कारवाई करीत दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले. तसेच आज कच्छ सीमेवर पाकचे एक ड्रोनही नष्ट केले. भारताने केलेल्या हवाई हल्ल्याने भारतीयांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. बालाकोट येथील दहशतवादी अड्ड्यावरून भारतावर मोठा हल्ला होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यामुळे भारताच्यावतीने ही कारवाई करण्यात आली असल्याचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतीय वायूसेनेच्या मिराज 2000 या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर 1000 किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब फेकल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. पाकिस्तान हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते. 12 मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा 3 कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही सांगितले जाते. तत्पूर्वी, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय वायूसेनेच्या विमानांनी एलओसीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. या हल्ल्यात किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या हल्ल्यात सुमारे 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
डोवाल यांनी पंतप्रधान मोदींना दिली माहिती
या हल्ल्यानंतर दिल्लीत मंत्रिमंडळाची तातडीची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन उपस्थित होते. भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक 2’ची माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे.
पुलवामा हल्ल्याचा भारतीय हवाईदलाने घेतला बदला
सर्जिकल स्ट्राइकनंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीला मोदींसह अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.
गुजरातच्या सीमेवर पाकिस्तानचं ‘ड्रोन’ नष्ट
कच्छच्या सीमेवर आज सकाळी साडेसहाच्या सुमारास हे ड्रोन घिरट्या घालत असताना दिसलं, त्यानंतर त्याला तातडीने नष्ट करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. ‘इंडियाटुडे’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइक कारवाईचाच हा देखील एक भाग होता किंवा अन्य काही, याबाबत अद्याप अधिकृत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
भारतीय सैन्यावर कौतुकाचा वर्षाव
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्करावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारत सरकारने पाकविरोधात केलेल्या कारवाईला राजकीय वर्तुळातून जोरदार पाठिंबा मिळत असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदी नेत्यांनी यांनी भारतीय हवाई दलाचे अभिनंदन केले आहे. उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकच्या भूमीत जाऊन केलेली ही कारवाई म्हणजे दुसरा ‘सर्जिकल स्ट्राईक’ आहे. या कारवाईनंतर भारतीय लष्कराचे कौतुक करत, भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना माझा सलाम...असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. भाजप नेते खा. सुब्रमण्यम स्वामी यांनी भारताच्या कारवाईचे जोरदार समर्थन केले आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे. त्यामुळे आपण तिथे कधीही बॉम्ब टाकू शकतो. यात काहीही चुकीचे नाही आणि आपण त्यांच्या हद्दीत घुसलो असलो तरी काही बिघडत नाही. पाकिस्तान भारताचे हजार तुकडे करण्याच्या घोषणा करतो. त्यामुळे त्यांच्यावर हजार किलोचे बॉम्ब टाकण्याचा निर्णय अत्यंत योग्य आहे, असे खा. स्वामी म्हणाले. मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पाकविरोधात भारतीय सैन्याने दसुर्यांदा केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे समर्थन करत लष्काराचे अभिनंदन केले आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधिमंडळात पेढे वाटले.
हल्ल्याच्या शक्यतेने कारवाई : गोखले
भारताने पाकमध्ये आज पहाटे पाकमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर एअरस्टाईक केल्यानंतर परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी गोखले म्हणाले की, पाकमधील बालाकोट येथे ‘जैश-ए-मोहंमद’चा म्होरक्या मसूद अझहर याचा साला युसूफ अझहर याचा भारतामध्ये दहशतवादी आत्मघातकी हल्ला करण्याची तयारी केली जात असल्याची गुप्त माहिती भारताला मिळाली होती. भारत सरकारने पाकिस्तान सरकारला पाकमधील दहशतवादी भारतात हल्ले करुन नुकसान करीत असल्याचे पुराव्यानिशी सांगितले. परंतु पाकने दहशतवादाविरुद्ध कारवाई केली नाही. त्यामुळे पहाटे दहशतवाद्यांचे बालाकोटमधील अड्डे बॉम्ब वर्षाव करुन उद्ध्वस्त केले. त्यात ‘जैश-ए-मोहंमदचे कमांडर, प्रशिक्षक व दहशतवादी ठार झाले.