दोघांनी गळफास घेऊन संपविले जीवन; आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

Foto

औरंगाबाद, दि.12 (सांजवार्ता ब्युरो): फायनान्स कंपनीत काम करणार्‍या एका 28 वर्षीय तरुणाने हडको भागात तर 45 वर्षीय ट्रकचालकाने भानुदासनगरमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

 विजय सुनील चव्हाण (वय 28 वर्षे, रा.श्रीकृष्णनगर, एन-9 हडको) व एकनाथ गोविंदराव राऊत (वय 45 वर्षे, रा. भानुदासनगर) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. मृत विजय चव्हाण हा शहरातील एका खाजगी फायनान्स कंपनीत कामाला होता. गेल्या 4 मे रोजी त्याच्या लग्‍नाला एक वर्षे पूर्ण झाले होते. शनिवारी रात्री विजयने त्याच्या खोलीत छताच्या अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेतला. नेहमी आनंदी राहणार्‍या विजयने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार रमेश जाधव करीत आहेत.मृत ट्रकचालक एकनाथ राऊत यांची सिल्‍लोड तालुक्यातील शिवना येथे एक एकर शेती आहे. या शेतीवर त्यांनी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन ट्रक घेतला. मात्र, कर्जाचे काही हप्‍तेे भरणा न केल्याने फायनान्स कंपनीच्या कर्मचार्‍यांनी राऊत यांच्या शेतात जाऊन विचारपूस केली. ही बाब त्यांना माहिती झाल्यापासून ते नैराश्यात होते. काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास राऊत यांनी पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन  आत्महत्या केली. हा प्रकार त्यांच्या मुलीच्या लक्षात आल्यानंतर राऊत यांना फासावरून उतरवून रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.राऊत यांनी आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हवालदार सुदाम दाभाडे तपास करीत आहेत.