देशी दारूचे बॉक्स गंगापूर पोलिसांच्या ताब्यात

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) : गंगापूर तालुक्यातील मालुंजा व शिरसगाव येथे दारूविक्री आणि विनापरवाना दारू वाहतुकीविरोधात गंगापूर पोलिसांकडून एकाच दिवशी दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. 

मालुंजा येथे देशी दारू विक्रीसाठी साठवून ठेवणाऱ्या एकाला, तर सिरसगाव फाटा येथे बॅगेतून देशी-विदेशी दारू घेऊन जाणाऱ्या दुसऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या दोन्ही कारवायांत २१५ बाटल्या आणि २३ हजार १०० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला.

पहिली कारवाई मालुंजा गावात मेंढी भालगावकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर अंबादास बरबडे यांच्या पत्र्याच्या शेडलगत करण्यात आली. या ठिकाणी महावीर रघुनाथ आघाडे (३५, रा. सिरसगाव, ता. गंगापूर) हा विनापरवाना देशी दारूची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत दुपारी १.०५ वाजता छापा मारला. त्याच्याकडे देशी दारूच्या १९२ सीलबंद बाटल्या आढळून आल्या. या दारूसाठ्याची किंमत १९ हजार २०० रुपये आहे.

दुसरी कारवाई गंगापूर-लासूर रोडवरील सिरसगाव फाटा येथे दुपारी ३.३० वाजता करण्यात आली. रस्त्याने पाठीवर भरलेली बॅग घेऊन जाणारा तरुण पोलिसांना संशयास्पदरीत्या दिसला. पोलिसांनी त्याची बॅग तपासली असता त्यात देशी आणि विदेशी दारूचा साठा आढळून आला. संजू दुमसिया ब्राह्मणे (२६, रा. गोदल्या पाणी, पोस्ट कुंजारी, ता. निवाली, जि. बडवाणी, मध्य प्रदेश, हल्ली मुक्काम मालुंजा, ता. गंगापूर) याच्याकडून विदेशी दारूच्या बाटल्या (२ हजार ४०० रुपये) आणि देशी दारूच्या १५ बाटल्या (१ हजार ५०० रुपये) असा एकूण ३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकाच दिवशी झालेल्या या दोन कारवायांमध्ये पोलिसांनी देशी दारूच्या बाटल्या आणि विदेशी दारूच्या आठ बाटल्या अशा एकूण २१५ बाटल्या जप्त केल्या. 

दोन्ही आरोपींकडे दारू बाळगण्याचा किंवा विक्री करण्याचा परवाना नसल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पदम जाधव, भागवत खाडे, गणेश जाधव, आणि महिला पोलीस कर्मचारी रेणुका धारकर यांच्या पथकाकडून करण्यात आली.