ब्रेक फेल, ट्रक बेलगाम ! कारसह दोन रिक्षांचा चुराडा

Foto
सात जण जखमी, चालक पसार
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): कांचनवाडी उड्डाणपुलावरून पैठण रोडकडे उतरताना अवजड ट्रकचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. अनियंत्रित ट्रकने इर्टिगा कारसह दोन रिक्षांना जोरदार धडक देत उडविले. या धडकेत तिन्ही वाहने रस्त्याच्या पलीकडील झुडपांमध्ये फेकली गेली. अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला असून, दोन्ही रिक्षांमधील सहा जण जखमी झाले आहेत. ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज असून, घटनेनंतर चालक पसार झाला. ही घटना बुधवारी (दि.१३) दुपारी १.५० वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडकडून सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाने आलेला १२ चाकी अवजड ट्रक (आरजे १७-जीए ५५६४) कांचनवाडी उड्डाणपुलावरून पैठण रोडकडे उतरत होता. याचवेळी
कांचनवाडी उड्डाणपुलावर अपघाताचा थरार
ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. सुसाट वेगाने आलेल्या ट्रकने प्रथम इटिंगा कार (एमएच २०, जीझेड १२३१) धडक देत उडविली. त्यानंतर ट्रकने दोन रिक्षांना (एमएच २०, ईके ८६१३ आणि एमएच २०, ईके ६२१०) जोरदार धडक दिली.
अग्निशामक दलाकडून मदतकार्य
शिवसेनेचे पश्चिम तालुकाप्रमुख सुमित त्रिवेदी हे अपघातस्थळावरून जात असताना त्यांचे सहकारी अनिकेत पाखरे यांनी अग्निशामक दलाला फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, ब्रेक निकामी होण्याचे नेमके कारण आणि अपघाताची पुढील माहिती तपासातून स्पष्ट होणार आहे.
वाहने झुडपांमध्ये फेकली गेली
धडक इतकी भीषण होती की, कारसह दोन्ही रिक्षांचा चुराडा झाला. तिन्ही वाहने रस्त्याच्या पलीकडील झुडपांमध्ये फेकली गेल्याने अपघाताची तीव्रता स्पष्ट झाली. कारचालक वाहनात अडकल्याने गंभीर जखमी झाला, तर दोन्ही रिक्षांमधील सहा प्रवासी जखमी झाले.