टोकियो : उत्तर कोरियाने पूर्व दिशेने समुद्राकडे संशयास्पद आंतरखंडीय (बॅलिस्टिक) क्षेपणास्त्र डागले असल्याची माहिती मिळत आहे. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने याला दुजोरा दिला आहे. पश्चिम आशियात इराण-इस्रायल यांच्यात आधीच युद्धाचा भडका उडालेला असताना आता पूर्व आशियातही तणाव निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
उत्तर कोरियाकडून होणाऱ्या लष्करी हालचालीनंतर जपान सरकारने तातडीचा इशारा दिला आहे. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, सध्याच्या ताज्या घडामोडींबद्दल जनतेने सतर्क राहावे. उत्तर कोरियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागले आहे. पुढील माहिती लवकरात लवकर देऊ.
या घटनेनंतर जपानच्या पंतप्रधान सनाए ताकायची यांनी क्षेपणास्त्र प्रक्षेपण केलेल्या मार्गावर तात्काळ आपत्कालीन यंत्रणा सक्रिय केली आहे. फेब्रुवारी 2026 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ताकायची यांनी प्रादेशिक सुरक्षा आणि जपानी भूभागाच्या संरक्षणावर आपण लक्ष देऊ असे म्हटले होते.
जपानच्या एनएचके या सरकारी वृत्तसंस्थेने शनिवारी दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाच्या या नव्या शस्त्र चाचणीमुळे या प्रदेशातील सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले असून तणाव वाढला आहे. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणानंतर जपानच्या तटरक्षक दलाने तात्काळ प्रतिसाद दिला असून समुद्रातील जहाजांना इशारा दिला असून पुढीच सूचनांची अंमलबजवाणी करण्यास सांगितले आहे.
जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान सनाए ताकायची
दक्षिण कोरियाच्या लष्कराने स्थानिक माध्यमांना दिलेल्या एका निवेदनात म्हटले की, हे क्षेपणास्त्र उत्तर कोरियाच्या पूर्ण किनाऱ्यावरील समुद्रात सोडले गेले. यावर अधिक माहिती देण्यास लष्कराने नकार दिला. तर जपानच्या तटरक्षक दलाने सदर क्षेपणास्त्र समुद्रात कोसळ्याचे म्हटले.