नरसापूर चिमुरडी खून प्रकरणी नराधमाला फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे कठोर शिक्षा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Foto
नागपूर  : पुण्याच्या नसरापूरमध्ये एका साडेतीन वर्षीय चिमुरडीवर ६५ वर्षांच्या नराधमाने अत्याचार करून खून केला. क्रूरतेचा कळस म्हणजे दगडाने ठेचलेला मृतदेह शेणाच्या ढिगार्‍याखाली पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. संतप्त ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्गावर शुक्रवारी रात्री आंदोलन केले. त्यानंतर शनिवारी मोर्चा काढून बंद पुकारला. या प्रकरणी राजगड पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
 
नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे. पण ते लोकशाहीत करता येत नाही. काही लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो, त्यांनी परिस्थिती समजून घेतली. आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. काही लोक त्यांनाही जाऊ देत नव्हते. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मी काल स्वत: पीडितेच्या वडिलांशी दोनवेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं, आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करुन घ्यायची आहे. त्यासाठी वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं, याकरता माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेत आहोत.

नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे
लोकशाहीत आपल्या सगळ्यांना वाटतं, अशा नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे. पण ते लोकशाहीत करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते. पण कोणालाही कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये, यादृष्टीने कोणताही कोणतीही पळवाट न ठेवता या नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल याचा प्रयत्न राज्य सरकार करेल. न्यायालयातून हे प्रकरण वेगाने मार्गी लावलं जाईल. तसं लेखी पत्र आम्ही पीडितेच्या कुटुंबाला दिलं आहे. ही घटना गंभीर आहे, रोष साहजिक आहे. नागरिकांचा रोष असणं काही चुकीचं नाहीङ्घङ्घ असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो
काही लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो, त्यांनी परिस्थिती समजून घेतली. त्यानंतर पोलीस आयुक्तांशी चर्चा करुन त्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने काही लोक त्यांनाही जाऊ देत नव्हते. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होते. ते लोक कोण आहेत, हे लक्षात आले आहे. मात्र, मुलीच्या वडिलांनी जी काही भूमिका घेतली, त्यासाठी मी आभारी आहे. कुटुंबाच्या पाठीशी आहोत. आम्ही आरोपीवर यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यांचीही माहिती घेत आहोत. मात्र या गुन्ह्यातून तो बाहेर येऊच शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.