मदनी चौक परिसरातील घटना : आरोपींच्या आवळल्या मुसक्या
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो):
मदनी चौक परिसरात कौटुंबिक वादातून मामेभावाच्या डोक्यात हातोडीने वार करून हत्या केल्याची थरारक घटना रविवारी सकाळी घडली. फरेस अब्दुल अजीज अलकेसरी (३२, रा. पडेगाव) असे मृत तरुणाचे नाव असून, या हल्ल्यात त्याचा मित्रही गंभीर जखमी झाला आहे. घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान फरेसचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
अहमद खलील बादाम (४०) आणि अदनान खलील बादाम (३५, दोघे रा. बारी कॉलनी) या दोन सख्य्या भावांना अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक गणेश ताठे यांनी दिली. यातील अहमद हा चालक, त. अदनान हा जिम ट्रेनर आहे. मृत फरेस हा आरोपींचा मामेभाऊ होता. सय्यद शहेजाद अली उर्फ सिराज नासेर अली (३०, रा. कासाबरी दर्गाजवळ, पडेगाव) याच्या तक्रारीनुसार, तो फर्निचरचे काम करतो.
रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याचा मित्र फरेस त्याच्या घरी आला. दोघे दुचाकीने फारेसच्या घरी गेले. तेथून कारने दोघे सेंट्रल नाका येथे कचरा गाडी घेण्यासाठी आले. फरेस आणि फिर्यादी सय्यद शहेजाद हे दोघे कचरा गाडी घेऊन मदनी चौकातील टाकळकर सोसायटी येथे आले होते. तेथील सुपरवायझरसोबत ते बोलत असताना आरोपी अहमद आणि अदनान हे तिथे मोपेडवर आले.
आरोपी अहमदच्या हातात दांडा तर अदनानच्या हातात हातोडा होता. जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर, अदनान याने हातातील लोखंडी हातोड्याने फारेसच्या डोक्यावर वार केले. हातोड्याचा वार अडवताना फरेस याचा हात फॅक्चर झाला. तसेच, अहमदने लाकडी दांडक्याने त्याच्या मानेवर व डोक्यावर मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले. शोएब आणि शहबाज यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांनाही घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान फारेसचा सायंकाळी मृत्यू झाला. जिन्सी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













