छत्रपती संभाजीनगर : (सांजवार्ता ब्युरो) एका निवृत्त न्यायधीशांनी विकसित करण्यासाठी दिलेल्या भूखंडावर बँकेकडून परस्पर कोट्यवधींचे कर्ज उचलून ८५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरला न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मधुसूदन अत्तारवार असे या आरोपी बिल्डरचे नाव आहे.
निवृत्त न्यायाधीश त्र्यंबकराव जाधव यांचा बेगमपुरा येथील तळेश्वर हौसिंग सोसायटीत भुखंड आहे. हा भूखंड त्यांनी मधुसूदन दिलीप अत्तरवार या बिल्डरला डेव्हलप करण्यासाठी दिला. यासाठी झालेल्या करारानुसार
बिल्डरने भूखंड तारण ठेवणे किंवा त्यावर कर्ज न घेण्याचे नमूद करण्यात आलेले होते. दरम्यान बिल्डर अत्तरवार यांनी भुखंडावर ३५ टक्के बांधकाम केल्यावर डेव्हलपचे काम बंद पडले. त्र्यंबकराव जाधव यांनी बिल्डरला भेटण्यासाठी प्रयत्न केले. मात्र अत्तरवार त्यांना टाळत होता. दरम्यान त्र्यंबकराव जाधव यांना भूखंडावर झालेल्या बांधकामावर यवतमाळ अर्बन को. आप. बँकेची कर्ज घेतल्याची पाटी निदर्शनास आली. त्यानुसार त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता बिल्डर अत्तरवार याने जाधव यांचा तो भूखंड तारण ठेऊन कर्ज घेतल्याचे त्यांना सांगण्यात आले.
फसवणूक झाल्याचे जाधव यांच्या लक्षात आले. त्यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली.
त्यानुसार पोलिसांना बिल्डर अत्तरवार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र अत्तारवार फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली आणि २२ जून रोजी न्यायालयासमोर हजर केले. न्यायदंडाधिकारी एच. व्ही. देशमुख यांनी सरकारी वकील शेख यांचा युक्तिवाद आणि पोलीस उपनिरिक्षक मारोती मद्देवाड यांनी मांडलेले मुद्दे ग्राह्य धरले आणि अत्तरवार याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions