अतिक्रमणांवर पुन्हा फिरणार बुलडोझर

Foto


छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता प्रशासन पुन्हा ॲक्शन मोडवर आले असून अतिक्रमणांवर बुलडोझर चालविण्यात येणार आहे. चार महिन्यांपासून बंद असलेली मोहीम पुन्हा सुरू केली जाणार असून, महापालिका आणि पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी विकास आराखड्यातील 8 रस्ते निश्‍चित केले आहेत. परंतु कारवाईपूर्वी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार भूसंपादनाची रीतसर प्रक्रिया राबविण्याच्या सूचनाही श्रीकांत यांनी विभागप्रमुखांना दिल्या आहेत.

दसरा-दिवाळी आणि त्यांनतर मनपा निवडणूक जाहीर झाल्याने पाडापाडी मोहिमेला ब्रेक लागला होता. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन 29 प्रभागांतून 115 नगरसेवक निवडून आले आहेत. महापौर, उपमहापौरपदासाठी 10 फेब्रुवारी रोजी विशेष सभा बोलावण्यात आली आहे. त्यापूर्वीच मनपा मुख्यालयात सोमवारी आयुक्त जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत विभागप्रमुखांची बैठक झाली. यात पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, रत्नाकर नवले हेही उपस्थित होते. शहरातील 8 डीपी रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण हटविण्याची मोहीम लवकरच सुरू केली जाणार आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार भूसंपादनाची रीतसर प्रक्रिया राबवून ही मोहीम राबवली जाणार आहे.