प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार काढताहेत भात्यातले बाण! उमेदवारांनी प्रचारासाठी कसली कंबर

Foto

औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीची रंगत आता वाढू लागली आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार भात्यातले बाण काढताहेत. सध्या तरी सौम्य भाषेत बोलणारी ही मंडळी अखेरच्या टप्प्यात जबरी वार करतील, असे दिसते. गंमत म्हणजे खैरे विरोधातच आपली लढाई आहे, हे दाखविण्याची जणू अहमिकाच विरोधकांमध्ये लागल्याचे दिसते.

यात सर्वात पुढे आहे ते शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे नेते आ.हर्षवर्धन जाधव. आमदार जाधवांनी आखाड्यात उतरताच खा.चंद्रकांत खैरे यांना पाडण्याची भाषा केली ! तोच धागा त्यांचा कायम आहे. परवा कन्‍नडच्या सभेतही आ.जाधव तावातावाने बोलले. खैरे यांची लढाई माझ्याशीच आहे, मीच खैरेंना पाडणार ! बाकी काँग्रेस-राष्ट्रवादीवर त्यांनी फारसा हल्‍लाबोल केला नाही. त्यांच्या प्रत्येक वाक्यात खैरे आणि शिवसेनाच होती.
 
अगदी उद्धव ठाकरे यांनाही त्यांनी त्यांचे कोण ऐकत नाही म्हणून झिडकारून टाकले. इम्तियाजभाई असा आमदार जलील यांचा उल्‍लेख करीत मुस्लिम मतदारांना गोंजारण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. खैरे विरोध हे एकमेव सूत्र घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आ.जाधव किती यशस्वी होतात हे लवकरच कळेल. काँग्रेसची उमेदवारी मिळवून आपल्या ताकदीचे दर्शन घडविणारे आ.सुभाष झांबड सेना आणि एमआयएम मला एकाच पारड्यात तोलत आहेत. या दोन्ही पक्षांनी दंगल घडवल्याचा आरोप झांबड करू लागले आहेत. सरळमार्गी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांची ही चाल आहे. काँग्रेसचे परंपरागत मतदार आणि विकासाची आस लागलेल्यांना स्वप्न दाखविण्याची त्यांची रणनीती आहे. आक्रमक प्रचार करण्यास ते प्रसिद्ध  नाहीत. मात्र, आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रकरणानंतर ते काहीसे आक्रमक झाले आहेत. निवडणुकीची रणनीती आणि नियोजन यातही आ.झांबड यांनी बाजी मारली आहे. तोलून-मापून बोलणारे आ.झांबड विरोधी पक्षातील नाराजांना आपलेसे करण्यात सध्या तरी यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे आ.झांबड यांनी एकाच वेळी शिवसेना एमआयएमला अंगावर घेऊन आपली दिशा स्पष्ट केली. 

एमआयएमने अजून तरी आपली अस्त्र बाहेर काढली नसली तरी रणनीती ठरवण्यासाठी एमआयएमचे धुरीण कामाला लागले आहेत. या निवडणुकीत विकासाचा मुद्दा अग्रस्थानी असेल, असे दिसते. आ. इम्तियाज जलील यांची सौम्य प्रतिमाच मतदारांसमोर ठेवावी, असा प्रयत्न एमआयएम करू शकते. धार्मिकतेच्या मुद्द्यावर निवडणूक जाऊ नये, असा प्रयत्न जर एमआयएमकडून झाला तर त्याचा फटका खैरेंना बसेल यात शंका नाही. दुसरीकडे खैरे आपली लढाई एमआयएमशीच आहे, असे सांगून निवडणुकीचा ट्रॅक बदलण्याच्या प्रयत्नात आहेत. आता एमआयएम कोणती रणनीती घेऊन मैदानात उतरते, याकडे राजकीय विश्‍लेषकांचे लक्ष लागले आहे. सध्यातरी शिवसेनेला एमआयएम तर आ. हर्षवर्धन जाधव यांना शिवसेना मैदानात हवी आहे. 

दलित मतदारांवर दावा 
दरम्यान, जिल्ह्यात दलित व मुस्लिम मतदारांची संख्या साडेतीन लाखांहून अधिक आहे. या मतपेटीवर सर्वच उमेदवारांची नजर आहे. वंचित बहुजन आघाडी किती मते खेचते, यावर काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराचे यश-अपयश अवलंबून आहे. काँग्रेसचे आ.सुभाष झांबड, वंचित बहुजन आघाडीचे आ.जलील आणि शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे आ.हर्षवर्धन जाधव या तिघांनीही  दलित-मुस्लिम मतपेटीवर दावा ठोकला आहे. आता कोण किती मतदान खेचते, हे निकालानंतरच कळेल. दुसरीकडे हिंदू मतदारांमध्ये अधिकाधिक विभागणी व्हावी, असा एमआयएमचा प्रयत्न असेल. नाराज हिंदू मतदारांना आपल्याकडे खेचण्याची रणनीतीही एमआयएमने केली यात शंका नाही