वाल्मिक शिरसाठ यांच्या पाठपुराव्याला यश; दर गुरुवारी दोन बसफेऱ्यांचे नियोजन
गंगापूर, (प्रतिनिधी): गंगापूर श्रीक्षेत्र देवगड येथे दर्शनासाठी जाणाऱ्या गंगापूर व परिसरातील भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन गंगापूर ते देवगड बससेवा सुरू करण्याची मागणी स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष वाल्मिक शिरसाठ यांच्याकडे भाविकांनी केली होती.
या मागणीची दखल घेत शिरसाठ यांनी गंगापूर आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून गंगापूर आगाराच्या वतीने दर गुरुवारी सकाळी ७ वाजता व ११ वाजता अशा दोन बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. या बससेवेच्या पहिल्या फेरीचे पूजन वाल्मिक शिरसाठ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी बसपूजनाचा मान प्रवासी बापूराव लोखंडे व देवगड संगीता लोखंडे या दाम्पत्याला देण्यात आला. तसेच बसचे चालक व वाहक यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. गंगापूरहून थेट देवगड येथे जाण्यासाठी बससेवा उपलब्ध झाल्याने भाविकांची मोठी सोय होणार आहे. या सुविधेबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. जास्तीत जास्त भाविक व प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गंगापूर आगारप्रमुख विजय बोरसे यांनी केले आहे.












