महाकाय मशीन अंगावर कोसळल्याने उद्योजकाचा मृत्यू

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): सात टन वजनाची महाकाय मशीन अंगावर पडून झालेल्या दुर्दैवी घटनेत उद्योजकाचा करुण अंत झाला. नरसिंग मारुती खडके (६७, रा. एन-४, सिडको) असे मृताचे नाव आहे. क्रेन चालक आनंद म्हस्के, गांगुर्डे आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच
हा जीवघेणा अपघात घडल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरसिंग खडके यांची वाळूज एमआयडीसीत तिरुपती हायड्रोन्युमॅटिक्स अँड सर्व्हिसेस नावाची कंपनी आहे. त्यांनी एका कंपनीला यंत्रे पुरवण्याचे काम घेतले होते. १४ मे रोजी दुपारी ते चिकलठाणा
एमआयडीसीतील कंपनीत ७टन वजनाची बेंडिंग मशीन पोहोचवण्यासाठी गेले होते. तिथे फोर्कलिफ्टच्या साहाय्याने मशीन खाली उतरवण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी खडके जवळच उभे राहून चालकाला सूचना देत होते. फोर्कलिफ्ट चालक आनंद म्हस्के आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मशीन हाताळताना बेजबाबदारपणा केला. त्यांच्या
चुकीमुळे क्रेनमधून निसटलेली महाकाय मशीन थेट खडके यांच्या पायावर कोसळली. यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर खडके यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास सहायक निरीक्षक कैलास लहाने करत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions