दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी; उच्च न्यायालयाचा निर्णय

Foto
मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिले.  दिशा हिने आत्महत्या केली नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली, असा आरोप करून तिचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची|मागणी केली होती.  न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने बुधवारी या याचिकेवर निर्णय देताना प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले.

या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याची नियुक्ती केली जाईल. हे अधिकारी याचिकाकर्त्याचा जबाब नोंदवतील आणि गुन्हा दाखल करतील. याचिकाकर्त्याच्या मुलीचा मृत्यू ज्या परिस्थितीत झाला, त्याच्याशी संबंधित सर्व पैलूंचा तपास हे अधिकारी करतील. तपासादरम्यान गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे, एखाद्या व्यक्तीविरुद्ध वाजवी संशय घेण्याजोगी पुरेशी कारणे आहेत असे तपास अधिकार्‍याला वाटल्याशिवाय, त्या व्यक्तीला आरोपी मानले जाणार नाही, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

हा तपास ङ्गभारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३फ च्या तरतुदींनुसार केला जाईल व गुन्हा घडल्याचे निष्पन्न झाले, तर सक्षम न्यायालयासमोर योग्य तो अहवाल सादर केला जाईल. तपासात कोणताही गुन्हा घडला नसल्याचे आढळून आले, तर सक्षम न्यायालयासमोर योग्य ती ङ्गसमरीफ (अंतिम अहवाल) सादर केली जाईल. मात्र, अशा परिस्थितीत, त्या अहवालाला आव्हान देणारी निषेध याचिकाफ दाखल करण्याचा अधिकार याचिकाकर्त्याला असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकारी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि वस्तू सीबीआयच्या तपास अधिकार्‍याकडे सुपूर्द करतील. तसेच, वर नमूद केलेल्या अटींनुसार ही याचिका निकाली काढण्यात येत आहे. याचिका निकाली काढल्यामुळे, त्याच्याशी संबंधित इतर सर्व अर्जही निकाली काढले जात आहेत, असे न्यायालयाने म्हटले.

दिशाच्या वडिलांचा आरोप काय ?
तपासातील त्रुटींवर बोट ठेवताना त्यात गुंतलेल्या राजकीय व्यक्तींमुळे पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप सालियन यांच्यातर्फे करण्यात आला होता. या याचिकेवरील सुनावणी टाळण्यासाठीही प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला होता. घटना घडली त्या दिवसापासूनच पोलिसांनी हे प्रकरण कमकुवत होईल याचाच प्रयत्न केल्याचा दावा देखील त्यांनी केला. पोलिसांनी दिशाच्या अपघाती मृत्यूची नोंद ही तिच्या घरच्यांचे म्हणणे नोंदवण्यापूर्वीच का केली ? दिशाचे शवविच्छेदन ५० तासांनंतर का झाले ? करोना हे त्याचे कारण असेल, तर त्यानंतर काही दिवसांनी मृतावस्थेत सापडलेल्या सुशांतसिंह राजपूत याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अवघ्या सात तासांत कसे झाले ? पोलीस उपायुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन दुसर्‍याच दिवशी या घटनेला आत्महत्या कसे काय घोषित केले ? असे अनेक प्रश्न सतीश सालियन यांच्यातर्फे युक्तीवाद करताना उपस्थित करण्यात आले.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी, याप्रकरणी तपासाची प्राथमिक फेरी पूर्ण केली आहे. दिशाचा मृत्यू हा अपघाती असून त्यात कोणताही घातपात किंवा खून झाल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे, तिच्या मृत्यूची अपघाती मृत्यू अशी नोंद केली गेली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता नाही. तिच्या वडिलांनी पाच वर्षानंतर नव्याने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी उपलब्ध साक्षी पुरावे पुन्हा एकदा तपासून पाहिले. त्यातही दिशाचा मृत्यू ही आत्महत्याच असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा सरकारी वकील शिशिर हिरे यांनी केला.

आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
८ जून २०२० च्या रात्री दिशाच्या मालवणी येथील निवासस्थानी तिच्या जवळच्या मित्रांसह पार्टी सुरू होती. अचानक शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे, त्याचे अंगरक्षक, अभिनेता सूरज पांचोली आणि डिनो मोरिया तिथे आले. या सगळ्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिचा खून केल्याचा आरोपही सालियन यांच्यावतीने वकील निलेश ओझा यांनी याचिकेद्वारे केला होता. या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप याचिका करून याचिकेवर कोणताही निर्णय देण्यापूर्वी त्यांचे म्हणणे ऐकण्याची मागणी आधीच केली होती. त्यानुसार, त्यांना युक्तिवाद करण्यास परवानगी देण्यात आली होती आणि आपले नाव याप्रकरणी राजकीय सूडबुद्धीने गोवले जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता.