औरंगाबाद-मुंबईत व्हिडिओकॉनच्या कार्यालयांवर सीबीआयचे छापे

Foto
व्हिडीओकॉन कंपनीने न्यू पॉवर रिन्युएबल प्रा.लि. या कंपनीला कर्ज दिल्यामुळे हा व्यवहार अवैध ट्रान्जेक्शनअंतर्गत घेत सीबीआयने व्हिडीओकॉन उद्योग समूहाचे वेणूगोपाल धूत यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्याच अनुषंगाने सीबीआयच्या अधिकार्‍यांनी आज व्हिडीओकॉन कंपनीच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील कार्यालयावर धाडी टाकल्या आहेत. औरंगाबाद येथील चितेगाव व अदालत रोडवरील कार्यालयावर या धाडी सुरू आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात खळबळ माजली आहे. 

व्हिडीओकॉन कंपनीला आयसीआयसीआय बँकेकडून ३२५०  कोटी रुपयांचे कर्ज २०१२ मध्ये देण्यात आले होते. हे कर्ज मिळाल्यानंतर वेणूगोपाल धूत यांनी आयसीआयसीआय बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या भागीदारीत असलेल्या दोन व्यावसायिक कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचे अवैध कर्ज दिले होते. धूत यांनी २०१० मध्ये दीपक कोचर यांच्याबरोबर स्थापन केलेल्या न्यू पॉवर रिन्युएबल प्रा. लि.मध्ये ६४ कोटी रुपयांचे संपूर्ण भागभांडवल गुंतवले होते.

आयसीआयसीआय बँकेकडून व्हिडीओकॉनला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज मिळाल्यानंतर सहा महिन्यात धूत यांनी न्यू पॉवर रिन्युएबल प्रा. लि. या कंपनीचे ६४ कोटी रुपयांचे संपूर्ण शेअर्स फक्‍त ९ लाख रुपयांत देऊन टाकले. व्हिडीओकॉन कंपनीने आयसीआयसीआय बँकेकडून घेतलेल्या ३२५० कोटी रुपयांपैकी २८८० कोटी रुपये २०१७ पर्यंत भरलेच नाही. त्यामुळे आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉनच्या कर्जाचे अकाऊंट एनपीएमध्ये (अनुत्पादक मालमत्ता) टाकले होते.  चंदा कोचर आयसीआयसीआयच्या प्रमुख असताना वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन कंपनीला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. या कर्जाच्या बदल्यात धूत यांनी दीपक कोचर यांच्या न्यू पॉवर रिन्युएबल प्रा. लि. कंपनीत ६४ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप एका समभागधारकाने केला होता. या आरोपांनंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चंदा कोचर आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व सीईओ या पदावरून पायउतार झाल्या होत्या.


चंदा कोचरविरुद्ध गुन्हा दाखल

अवैध कर्जवाटप प्रकरणी व्हिडीओकॉन उद्योग समूहाचे वेणूगोपाल धूत व आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक व सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या न्यू पॉवर रिन्युएबल कंपनीवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने गुरुवारी व्हिडीओकॉन व न्यू ूपॉवर रिन्युएबल कंपनीच्या मुंबई व औरंगाबादमधील कार्यालयांवर छापे टाकले. गेल्यावर्षी मार्च महिन्यात सीबीआयने दीपक कोचर, वेणूगोपाल धूत आणि त्यासंबंधित अन्य काही  लोकांची प्राथमिक चौकशी सुरू केली होती. पदाचा गैरवापर करत कर्ज दिल्याप्रकरणी सीबीआयने चंदा कोचर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच व्हिडीओकॉन कर्जप्रकरणी देखील सीबीआयने नरिमन पॉईंट, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) सह मुंबईतील चार ठिकाणी आणि औरंगाबाद येथे छापेमारी केली आहे. व्हिडीओकॉन व सुप्रीम एनर्जीच्या कार्यालयांवर हे छापे टाकण्यात आले आहेत

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker