नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर मतचोरी आणि लोकशाहीवर आघात केल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाने काल देशव्यापी आंदोलन छेडले. गोव्यासह दिल्ली, गुवाहाटी, लखनऊ, पाटणा, शिमला आणि पंजाबसह विविध राज्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाविरोधात जोरदार निदर्शने केली. अनेक ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना अडवून ताब्यात घेतले, तर काही ठिकाणी बॅरिगेड्स तोडण्याचे प्रयत्न झाल्याने तणाव वाढला.
दिल्लीपासून ईशान्य भारतापर्यंत आणि उत्तर भारतातील प्रमुख राज्यांमध्ये काँग्रेसच्या आंदोलनाने राजकीय वातावरण तापले आहे. आंदोलकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या तात्काळ राजीनाम्याची आणि कारवाईची मागणी लावून धरली आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरूनही केंद्र व निवडणूक आयोगावर कठोर टीका करत हा मुद्दा अधिक तीव्र केला.
आसाममध्ये काँग्रेसने राजीव भवन येथून राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे मोर्चा काढला. या वेळी बॅरिगेड्स तोडण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांनी कठोर भूमिका घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्लीत इंडियन यूथ काँग्रेसकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. देशातील कोट्यवधी मतदारांना मतदान हक्कापासून वंचित ठेवले जात आहे, असा आरोप करत आंदोलकांनी आयोगाविरोधात घोषणाबाजी केली.
अनेक ठिकाणी तोडफोड
लखनऊमध्ये मुसळधार पावसातही काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाविरोधात निदर्शने सुरूच ठेवली. हिमाचल प्रदेशात राज्य निवडणूक आयोगाच्या फलकांची मोडतोड झाल्याची माहिती मिळाली. जम्मूमध्ये काँग्रेस खासदार डॉ. सय्यद नासीर हुसैन यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काँग्रेसने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ङ्गङ्घमुख्य निवडणूक आयुक्तांनी तात्काळ राजीनामा द्यावा, लोकशाहीवरील हा हल्ला सहन केला जाणार नाही. देशात ठिकठिकाणी आक्रमक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलने केली.
आंदोलकांवर पाण्याचा फवारा
ऑबिहार आणि पंजाबमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोग कार्यालयाकडे मोर्चा काढत तीव्र आंदोलन केले. काही ठिकाणी आंदोलकांनी कार्यालय परिसर घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाण्याचे फवारे वापरले. पंजाबमध्ये आंदोलन अधिक आक्रमक झाल्याचे चित्र दिसले. बॅरिगेड्सजवळ झालेल्या झटापटीमुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचेही समोर आले.
* दिल्लीत इंडियन यूथ काँग्रेसने जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने काही भागात वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी आंदोलकांना अडवून ताब्यात घेतले.
* आसाम काँग्रेसने राजीव भवन येथून मोर्चा काढत निवडणूक अधिकारी कार्यालय गाठण्याचा प्रयत्न केला. बॅरिगेड्स तोडण्याच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले.
* दोन्ही राज्यांत निवडणूक आयोग कार्यालयांवर धडक मोर्चे काढण्यात आले. काही ठिकाणी आंदोलकांना पांगवण्यासाठी पाण्याचे फवारे वापरण्यात आले. झटापटीचे प्रकार घडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.
* लखनऊमध्ये पावसातही आंदोलन सुरू राहिले. हिमाचलमध्ये फलकांची तोडफोड झाल्याचे समोर आले, तर जम्मूमध्ये काँग्रेस खासदारांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलन देशव्यापी झाल्याचे स्पष्ट झाले.