सिडकोत पाणीबाणी सुरूच...रामनगरातील नागरिकांनी मध्यरात्री घातला माजी महापौरांना घेराव

Foto
औरंगाबाद : उन्हाळा संपला तरी मनपा प्रशासनाला पाणीपुरवठ्याचे नियोजन करता आले नाही. गुरुवारी मध्यरात्री सिडकोतील वॉर्ड क्रमांक ८६ श्रीरामनगर, रामनगर येथे फक्‍त १५ मिनिटे पाणी सोडल्याने अनेक नागरिक पाण्यापासून वंचित राहिले. कमी वेळ पाणीपुरवठा केल्याने संतप्‍त झालेल्या नागरिकांनी वॉर्डाचे नगरसेवक तथा माजी महापौर बापू घडामोडे यांच्या घरावर मोर्चा काढत घेराव घातला.
 
गेल्या काही महिन्यांपासून सिडकोत अनियमितपणे पाणीपुरवठा  केला जातो. सिडको रामनगर भागातील नागरिकांना आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. शहराच्या इतर भागात चौथ्या दिवशी पाणीपुरवठा केला जातो. सिडको- हडकोतील नागरिकांना समान पाणी वाटप करा, या मागणीसाठी येथील नगरसेवकांनी अनेक वेळा मनपा प्रशासनाला लेखी पत्र दिले आहे. तरी सुद्धा प्रशासनाला पाणीपुरवठ्याचे नियोजन करता आले नाही. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. गुरुवारी रात्री १२ वाजता रामनगरमध्ये पाणीपुरवठा करण्यात आला. नळांना फक्‍त १५ मिनिटे पाणी आले. त्यामुळे काही नागरिकांना पाणी मिळाले तर काहींना मिळाले नाही. त्यामुळे शंभर ते दिडशे नागरिकांनी रात्री १२. ३० वाजता वॉर्डाचे नगरसेवक तथा माजी महापौर बापू घडामोडे यांच्या घराकडे मोर्चा वळविला. तेथे जावून नागरिकांनी घडामोडे यांना नळाला फक्‍त १५ मिनिटे पाणी आल्याची बाब सांगितली. घडामोडे यांनी पाणीपुरवठा अधिकार्‍यांशी संपर्क  साधला. संबंधित अधिकार्‍यांना पाणी लवकर सोडा नसता नागरिक पाण्याच्या टाकीवर येऊन आंदोलन करतील, असे सांगितले. त्यानंतर रात्री दीड वाजता पाणी सोडण्यात आले. सिडकोतील नागरिकांना अनियमित पाणीपुरवठा केला जात असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्‍त केली. रामनगरला नियमित व किमान एक तास पाणीपुरवठा केला जावा, अशी मागणी रामनगरवासीयांनी केली आहे.