सीजेपी देशभरात राबविणार 'क्या बोलती पब्लिक?' अभियान, बैठकीनंतर अभिजीत दीपकेंची घोषणा !

Foto
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरात आयोजित ''कॉक्रोच जनता पार्टी'च्या  दोन दिवसीय राष्ट्रीय कोअर कमिटी बैठकीचा गुरुवारी, ६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी यशस्वी समारोप झाला. संस्थापक अभिजीत दीपके यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पक्षाचा आगामी ॲक्शन प्लॅन जाहीर केला. देशातील नागरिकांच्या भावना समजून घेण्यासाठी येत्या सप्टेंबर महिन्यात राज्यभर आणि देशभरात 'क्या बोलती पब्लिक?' हे विशेष अभियान राबवण्याची मोठी घोषणा त्यांनी केली.

आंबेडकर, गांधी , नेहरू हि आमची विचारधारा....
माध्यमांशी बोलताना अभिजीत दीपके म्हणाले, "सीजेपीची विचारधारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांवर आधारित आहे. त्यांनी भारतासाठी जे स्वप्न पाहिले, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही संविधानाला धरून लढा देत आहोत. आमच्यासाठी आंदोलनाचे यश हे फक्त कुणाचा राजीनामा घेणे नाही, तर देशातील सामान्य नागरिकांच्या मनातील सरकार विरोधातील भीती पूर्णपणे संपणे हे खरे यश आहे."

महागडे शिक्षण, नीट घोटाळा अन् बेरोजगारीवर घणाघात
शिक्षणाच्या बजेटवर भाष्य करताना दीपके म्हणाले की, "आज देशात शिक्षण अत्यंत महाग आणि न परवडणारे झाले आहे, तर शिक्षण हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. सरकारी शिक्षण संस्थेवर काम करायला हवे. नीट  परीक्षा घोटाळा आंदोलनात जंतर-मंतरवर सरकारविरोधातील संताप उफाळून आला होता. आज जंतर-मंतरवर केवळ विद्यार्थी नव्हते तर लाखो बेरोजगार तरुण होते. देशातील अशिक्षित लोक निर्णय घेऊन सुशिक्षित तरुणांचे भवितव्य ठरवत आहेत. बेरोजगारी हा राजकीय आणि सामाजिक मुद्दा आहे."

माध्यमांनी सत्तेला प्रश्न विचारले पाहिजेत
अभिजीत दीपके यांनी न्यायव्यवस्थेवर, निवडणूक विभाग आणि माध्यमांच्या भूमिकेवरही कडक टीका केली. "आज देशातील न्यायव्यवस्थेवर नागरिकांचा अविश्वास निर्माण झाला असून निर्णय सरकारच्या बाजूने झुकताना दिसत आहेत. निवडणूक आयोगावर प्रश्न चिन्ह आहेत. तसेच जोपर्यंत मीडिया स्वतंत्रपणे काम करणार नाही, तोपर्यंत देशात बदल होणार नाही. माध्यमांनी सत्तेला ठामपणे प्रश्न विचारले पाहिजेत," असे सांगत ज्यांनी आंदोलनात पाठिंबा दिला, त्या सर्वांना एकत्र घेऊन सीजेपी पुढील लढा उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.