सीजेपीचे अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर, पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात

Foto
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील जंतरमंतर परिसरावर दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि छावणीचे स्वरूप असतानाही कॉकरोच जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी पोलिसांना मोठा चकवा दिला आहे. अभिजित दिपके यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनाची सूत्रे हाती घेतलेले अजिंक्य शिंदे, पक्षाचे सह-संयोजक आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी इतर सहकार्‍यांसह मंगळवारी पहाटे सुरक्षा कडे तोडून थेट जंतरमंतरवर अचानक धडक मारली. हाती तिरंगा घेऊन आंदोलनकर्ते घोषणाबाजी करत जंतरमंतरवर दाखल झाल्याचे दिसताच परिसरात तैनात असलेल्या दिल्ली पोलिसांची एकच धावाधाव उडाली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सौरभ दास, आशुतोष रांका, अजिंक्य शिंदे आणि त्यांच्या इतर सहकार्‍यांना पुन्हा ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर, संसद मार्ग आणि कनॉट प्लेस परिसरातील सर्व सीमा सील केल्या होत्या. मात्र, कडक नाकेबंदी असतानाही  चे नेते व कार्यकर्ते पोलिसांची नजर चुकवून सकाळच्या सुमारास जंतरमंतरवर पोहोचण्यात यशस्वी झाले.

हातात तिरंगा घेऊन घोषणाबाजी
जंतरमंतरवर पोहोचताच नेत्यांनी हातात राष्ट्रध्वज तिरंगा फडकवत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या आणि मतदार यादीतील पारदर्शकतेच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. आंदोलक मुख्य ठिकाणी पोहोचल्याचे समजताच अतिरिक्त पोलीस कुमक घटनास्थळी पोहोचली आणि काही मिनिटांतच सौरभ दास, अजिंक्य शिंदे आणि आशुतोष रांका यांच्यासह संपूर्ण गटाला ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमधून अज्ञातस्थळी हलवण्यात आले.

नेत्यांच्या अटकेनंतरही आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार
विमानातून अभिजित दिपके यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी अजिंक्य शिंदे आंदोलनाचे नेतृत्व करतील अशी घोषणा केली होती. त्यानुसार शिंदे आणि सहकार्‍यांनी दिल्ली पोलिसांच्या नाकाबंदीला आव्हान देत थेट जंतरमंतर गाठल्याने दिल्ली पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नेत्यांची सातत्याने धरपकड होत असली, तरी पक्षाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या मार्गांनी दिल्लीत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याने राजधानीतील तणाव कायम आहे.