सीजेपी नेत्यांनी घेतली राकेश टिकैत यांची भेट, शेतकरी, विद्यार्थी अन्...; संयुक्त आघाडी उभारण्याचा प्लॅन

Foto
नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर आता सीजेपी (कॉकरोच जनता पार्टी) नव्या प्लॅनच्या तयारीत दिसत आहे. 'कॉकरोच जनता पार्टी' चा  प्रवक्त्या आशुतोष रांकासह काही मंडळींनी, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. महत्वाचे म्हणजे, भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.  

इंडिया टुडेने दिलेल्या एका वृत्तानुसार, या बैठकीला सीजेपी प्रवक्ता आशुतोष रांका आणि भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांच्यासह इतरही काही नेते उपस्थित होते. सीजेपीच्या म्हणण्यानुसार, या बैठकीत शेतकरी, विद्यार्थी आणि तरुणांना एकत्र आणण्यासह भविष्यातील रणनीतींवर चर्चा झाली. माध्यमांतील वृत्तांनुसार, रांका म्हणाला, "आम्हाला आशा आहे की आमचे शेतकरी बांधव आणि देशातील विद्यार्थी व तरुण, मोदी सरकारला चारही बाजूंनी घेण्याचे काम करतील."
 
राजस्थानमध्ये महापंचायतीचे आयोजन 
दरम्यान, भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांनी ३० जुलै रोजी राजस्थानमधील अलवरमधील सरिस्का परिसरातील १८६ गावांसाठी महापंचायतीची घोषणा केली आहे.

अन्यथा पुन्हा आंदोलन
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपी  प्रमुख अभिजीत दीपकेने मोठे विधान केले होते. "ही पहिले विकेट आहे, ही तर फक्त सुरुवात आहे," असे म्हटले होते. दरम्यान, "सरकारने २५ जुलैला झालेल्या कराराचा सन्मान करावा, आम्हाला लेखी द्यावे, सर्व एफआयआर मागे घ्याव्यात आणि नवीन एफआयआर दाखल होणार नाहीत याची खात्री करावी. असे न झाल्यास, आम्हाला पुन्हा आंदोलन सुरू करणे भाग पडेल," असे रांकाने म्हटले आहे.