नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दिल्लीतील जंतरमंतर येथे आयोजित आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. नवी दिल्ली परिसरातील 'प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया'च्या इमारतीजवळ आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षादरम्यान पोलिसांवर जोरदार दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत घटनास्थळावरून सुमारे ५० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे आधीच तणावाखाली असलेल्या लुटियन्स दिल्ली आणि संसद मार्ग परिसरातील सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत.
पीटीआय इमारतीजवळ नेमके काय घडले?
प्राथमिक माहितीनुसार, दुपारी जंतरमंतरच्या दिशेने कूच करण्यासाठी सुमारे ५० आंदोलकांचा गट पीटीआय इमारतीजवळ अचानक जमला. पोलिसांनी या जमावाला अडवून पांगवण्याचा प्रयत्न केला असता, आंदोलकांकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू करण्यात आली. या अचानक झालेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
५० जणांना घेतले ताब्यात
दगडफेक होताच अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली आणि पोलिसांनी संपूर्ण परिसर घेरून दगडफेक करणाऱ्या सर्व ५० आंदोलकांना जागीच ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमधून हलवले.
दिल्ली पोलिसांच्या अधिकृत भूमिकेकडे लक्ष
ही घटना घडल्यानंतर दिल्ली पोलिसांनी संसद मार्ग, पटेल चौक आणि संसद भवनाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील बंदोबस्त अधिक कडक केला आहे. दगडफेक करणाऱ्यांचा उद्देश काय होता आणि हे आंदोलक मूळचे कुठून आले होते, यावर दिल्ली पोलिसांचे सविस्तर अधिकृत निवेदन लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.