सी एम चषक क्रीडा महोत्सवात भाजपाला राष्ट्रीय खेळ हॉकीचा विसर ; आपल्या सोयीनुसार क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन

Foto
देशातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव असल्याचे सांगत महाराष्ट्रभर जाहिरातीतून आणि होर्डिंगबाजीतून सी एम चषकाचा बडेजाव करणाऱ्या भाजपने क्रीडापटूंच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आपल्या सोईनुसार कमी खर्चातील क्रीडा प्रकार निवडून औरंगाबाद शहरात होत असलेल्या क्रीडा महोत्सवात देशाचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकी या खेळाला बाजूला ठेवण्याचा महाप्रताप औरंगाबादेतील आयोजकांनी केला आहे. परिणामी या कृतीमुळे देशाचा राष्ट्रीय खेळ हॉकी खेळणाऱ्या खेळाडूंचा प्रचंड हिरमोड झाला आहे. 'सीएम चषक' स्पर्धा १३ ते २० डिसेंबर २०१८ दरम्यान होत असून  झालानी मैदान, मिलेनियम पार्कसमोर, चिकलठाणा एमआयडीसी येथे क्रीडापटूंना फारशी माहित नसलेल्या ठिकाणी आयोजित केली आहे. हे विशेष. 

आजच्या तरुण पिढीने मोबाईल गेममध्ये अडकून न पडता मैदानी खेळांना प्राधान्य देऊन शारीरिक-मानसिकदृष्ट्या सशक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभरात सुरू असलेल्या 'सीएम चषक'चे आयोजन औरंगाबादेत करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावर सुरु असलेल्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमाच्या धर्तीवर राज्यातील तळागाळातील गुणवत्ता शोधण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘सीएम चषक’ क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला तुफान प्रतिसाद मिळत असल्याचा दावा संयोजन समितीने केला आहे. क्रिकेट स्पर्धेत विजेत्या संघाला, खेळाडूंना रोख आकर्षक बक्षिसे, मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीत प्रमाणपत्र देण्यात येईल. या सीएम चषक स्पर्धेत क्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, कॅरम, कुस्ती, चित्रकला, रांगोळी, कविता, नृत्य आदी स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेद्वारे राज्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबाशी जोडण्याचा प्रयत्न असून हा प्रयत्न यशस्वी होत आहे.  गावपातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व ५० लाख युवकांना पक्षासोबत जोडण्याचा उद्देश ठेवून भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर सीएम चषक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये २८८ विधानसभा मतदारसंघांमधून ७५ दिवसात असंख्य खेळाडू व क्रीडाप्रेमींना एकत्रित आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.  

भाजपच्या युवा मोर्च्याच्या संयोजनात जिल्हाभरात सि एम चषकाच्या निमित्ताने क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हजारो क्रीडापटूंनी विविध खेळामध्ये आपला उत्स्फुर्त सहभाग नोंदवत या सि एम चषकाला  मोठा प्रतीसाद दिला आहे. भाजपच्याच पुढार्यांनी राज्यातील २८८ मतदार संघात जाहिरातबाजी करून राजकीय क्रीडा रंगवली आहे. तरुण मतदारावर प्रभाव पडावा आणि आगामी निवडणुकांमध्ये युवकांचा भाजपाकडे कल असावा अशी राजकीय खेळी खेळत भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच तोफेच्या तोंडी देत या सीएम चषकाचे आयोजन केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. 

स्पर्धांचे ठिकाण अडगळीत 

औरंगाबादेत विभागीय क्रीडा संकुल आहे. विविध स्पर्धा घेण्यासाठी याठिकाणी चांगली मैदाने आहेत मात्र या मैदानाची प्रचंड दुर्दशा झाल्याने क्रीडापटूंना खेळण्यास अडचणी निर्माण होत आहे. शहरात आमखास मैदान, एमजीएम, तसेच इतर ठिकाणीही चांगली मैदाने असताना त्याचा वापर न करता औरंगाबादच्या भाजप संयोजकांनी आजपासून क्रीडापटूंना फारशी माहित नसलेल्या चिखलठाण औद्योगिक परिसरातील झालानी मैदानावर  'सीएम चषक' क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या ठिकाणी खेळाडूंना जाण्यासाठी फारशी वाहन व्यवस्था नसून ग्रामीण भागातील खेळाडूंना खाजगी वाहनाने जाण्याशिवाय पर्याय नाही हे वास्तव आहे.